चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील काडवली चौरसवाडी येथील सुभेदार पांडुरंग महादेव महाडिक यांचे वयोपरत्वे नुकतेच पनवेल येथे निधन झाले. सुभेदार पांडुरंग महाडिक यांनी देशाच्या तीन युद्धात लढून युद्धभूमी गाजवून देशाची सेवा केली. या योद्धाच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चारगाव महाडीक यांचे नाव सैन्यदलात मराठा रेजिमेंटमध्ये आदराने घेतले जाते. निरबाडे, खांदाट, पाली (ता. चिपळूण), काडवली (खेड) या चारगावातून अनेकजण सैन्यदलात दाखल झाले आहेत. बेळगाव येथील मराठा रेजिमेंट सेंटरला स्वर्गीय सुभेदार पांडुरंग महाडीक यांनी एक वेगळीच छाप पाडली होती. ते क्वार्टर मास्टर म्हणून प्रचलित होते. मराठा रेजिमेंट सेंटरला अनेक सैनिकांना घडवले आहे. स्वर्गीय पांडुरंग महाडिक यांनी देशाच्या तीन युद्धात सन १९६२ चीन युद्ध, १९६५ व १९७१ पाकिस्तान या तीनही युद्धात लढून युद्धभूमी गाजवून खऱ्या अर्थाने देशसेवा केली आहे. लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावी येऊन शेती केली. ते कधीच स्वस्थ बसले नाहीत. चौरसवाडी येथील प्रत्येक कार्यक्रमात ते हिरीहीरीने सहभागी होत असत. नुकतेच त्यांचे वयोमानपरत्वे निधन झाले आहे. त्यांच्यावर काडवली येथील समशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुलगे, सुना, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.












