श्रीराम विद्यालय वेरवली बु. मधील विनोद बंडगर यांची राज्यस्तरावर निवड

लांजा | प्रतिनिधी : 

श्रीराम विद्यालय वेरवली बु. येथील उपक्रमशील शिक्षक विनोद यशवंत बंडगर यांची ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक प्रतिकृती (माध्यमिक गट) या विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

श्री. बंडगर यांनी सादर केलेल्या गणितीय शैक्षणिक प्रतिकृतीतून शैक्षणिक नाविन्य, प्रयोगशीलता व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला होता. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मारुती डोळस, सचिव संतोष पडवणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल रेडीज व सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक अरुण डोळे, तसेच शिक्षकवर्ग, पालकवर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. बंडगर यांच्या या यशामुळे श्रीराम विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा नावलौकिक वाढला असून विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत.