सावंतवाडी तालुका वकील संघटनेचा ‘लेक्स डिस्कशन’ उपक्रम; वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प दिनांक २० डिसेंबर रोजी दिवाणी न्यायालय, सावंतवाडी येथे उत्साहात गुंफण्यात आले. या सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून कुडाळ येथील प्रसिद्ध दिवाणी वकील, व्हिक्टर डॉन्टस विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. संदेश तायशेटे यांनी ‘प्राथमिक पुरावा, दुय्यम पुरावा आणि दुय्यम पुरावा कसा सादर करावा’ या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
भारतीय साक्ष अधिनियमातील ‘Primary evidence’ (प्राथमिक पुरावा) आणि ‘Secondary evidence’ (दुय्यम पुरावा) हे विषय न्यायालयीन कामकाजात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. ॲड. तायशेटे यांनी आपल्या व्याख्यानात हे दोन्ही विषय अत्यंत सोप्या भाषेत विशद केले. एखादी घटना किंवा वस्तुस्थिती सिद्ध करण्यासाठी ‘उत्तम पुरावा’ म्हणून प्राथमिक पुराव्याचे महत्त्व काय असते आणि प्राथमिक पुरावा उपलब्ध नसताना दुय्यम पुरावा कोणत्या परिस्थितीत व कसा सादर करावा, याबद्दल त्यांनी इत्यंभूत माहिती दिली.
आपले विवेचन अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी नामदार सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निवाड्यांचे (Judgments) सविस्तर विश्लेषण केले. यामुळे कायद्यातील हा तांत्रिक व क्लिष्ट विषय समजून घेणे कनिष्ठ व ज्येष्ठ अशा दोन्ही स्तरांवरील वकिलांना सोयीचे झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. संदेश तायशेटे यांचे स्वागत सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी केले.
यावेळी ॲड. राघवेंद्र नार्वेकर, ॲड. परशुराम चव्हाण, ॲड. माधवी पेंडूरकर, ॲड. चुन्नीलाल आकेरकर, ॲड. सुप्रीम परब, ॲड. सुमित सुकी, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. अभिजित चव्हाण, ॲड. पंकज आपटे, ॲड. सर्वेश कोठावळे, ॲड. राहुल गायकवाड, ॲड. प्रवीण काळसेकर, ॲड. किरण तोरसकर, ॲड. प्रतीक्षा भिसे, ॲड. वामन निर्गुण, ॲड. अनिल केसरकर, ॲड. अनिल निरवडेकर, दोडामार्ग येथील ॲड. प्रवीण नाईक यांच्यासह कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ॲड. अलका कासकर यांनी केले.
पुढील व्याख्यान ३ जानेवारीला
या व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी गुंफले जाणार आहे. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. अवंतिका गजानन कुलकर्णी या ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ (Maharashtra Public Trusts Act) या विषयावर दुपारी १२ वाजता सावंतवाडी न्यायालयात मार्गदर्शन करणार आहेत. या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील सर्व वकील मंडळींनी आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी केले आहे.













