नाटे बाजारपेठेत भीषण आग, सात दुकाने जळून खाक.. उद्योजकांचे स्वप्न उद्ध्वस्त..

लाखोंचे नुकसान

शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

नाटे, साखरी नाटे ग्रामपंचायत आणि युवकांनी आग विझवण्यासाठी केले कसोशीने प्रयत्न

राजन लाड (जैतापूर): नाटे बाजारपेठने रविवारी रात्री इतिहासातली सर्वात भयावह रात्र पाहिली. रात्री १२.३० च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने एका संपूर्ण इमारतीला गिळंकृत केले. सात दुकाने, सात संसार, आणि अनेकांचे रोजगाराचे स्वप्न अवघ्या काही तासांत राख झाले.

ही इमारत राजेश दत्ताराम पावसकर राह. धाऊलवल्ली यांचे मालकीची असून, यामध्ये कोणतीही रहिवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाळा नं. दिगंबर गिजम यांचे उपहारगृह असून त्यांचे संपूर्ण फर्निचर, किचन यंत्रणा जळून गेली आहे. तर गाळा नं. २ भीम खंडी यांचे चायनीज फास्ट फूड सेंटर जळून खाक झाले आहे. तर गाळा नं. ३ मध्ये असलेले प्रदीप मयेकर यांचे टेलरिंग शॉपमधील मशिन्स, तयार कपडे जळून गेले आहेत. तर गाळा नं. ४ मधील केदार ठाकूर कापड व प्लास्टिक वस्तू विक्री दुकान तसेच गाळा नं. ५ मधील प्रसाद पाखरे यांच्या फोटो स्टुडिओ आगीच्या भक्षस्थानी पडून कॅमेरे, प्रिंटिंग उपकरणे, संगणक जळून गेला आहे. तसेच गाळा नं. ६ मध्ये निकिता गोसावी यांचे ब्युटी पार्लर तर गाळा नं. ७ मधील नारायण गोसावी यांचे कटलरी साहित्यांचे गोडाऊन जळून खाक झाले आहे.

आगीची माहिती मिळताच सागरी पोलीस स्टेशन नाटेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर, नाईट चेकिंग अमलदार व तत्पर पोलीस कर्मचारी, नाटे सरपंच संदीप बांदकर घटनास्थळी धावले. ग्रामस्थांनी रात्रीचा विचार न करता स्वतःच्या वाहनांतून पाण्याची व्यवस्था केली. जो तो होईल त्याप्रमाणे आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.

राजापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी रात्री अडीचच्या सुमारास पोहोचताच आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोवर सर्व गाळे जळून भस्मसात झाले होते. नाटे येथील अनेक युवकांबरोबरच साखरी नाटे येथील युवकांचाही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा सहभाग होता. सकाळी ४ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, पण उद्योजकांच्या जीवनात मात्र गडद अंधार पसरला. “हे फक्त दुकान नव्हते, आमचं जग होतं,” असं भावुक उद्गार एका व्यापाऱ्याने अश्रूंनी डोळे पुसताना काढले.

धर्मभेद विसरून एकत्र आले युवक – माणुसकीचा उत्तुंग प्रत्यय

या आगीची माहिती मिळताच नाटे गावातील अनेक युवक तात्काळ घटनास्थळी धावले. विशेष म्हणजे साखरी-नाटे येथील मुस्लिम युवकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.

मजीद गोवळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही केवळ आग नव्हती, ती संधी होती एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची. आम्ही न पाहता कोणाचे दुकान, कोणाचा धर्म – फक्त माणूस म्हणून रात्रभर पाणी आणत राहिलो.” सविस्तर नुकसानाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे, मात्र प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान निश्चित आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग व नगरपालिकेच्या समन्वयाने पुढील चौकशी सुरू आहे.

राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे देखील घटनास्थळी दाखल

नाटे येथे आग लागल्याची घटना समजल्यानंतर राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे देखील घटनास्थळी पोचले आहेत आणि नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करत आहेत. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ॲड. जमीर खलिफे यांना स्थानिक ग्रामस्थांच्या फोन आला. त्यानंतर त्यांनी लगेचच नगर परिषद प्रशासनाशी बोलून रातोरात अग्निशमन गाडी पाठवली.