मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामदैवत श्री देवी भगवती मातेचा वार्षिक जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुणगे सडेवाडी येथील वाहतुकीस धोकादायक बनलेल्या रस्त्याची डागडुजी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केल्याने भाविकांन मधून समाधान व्यक्त होत आहे.
मुणगे सडेवाडी येथील रस्ता अत्यंत दयनीय आणि धोकादायक बनला होता. या रस्त्यावर खड्डे पडले होते, तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढल्याने वाहन चालवताना अडथळा निर्माण होत होता. श्रीदेवी भगवती जत्रोत्सवाच्या काळात येथे भाविकांची वर्दळ असते, ही बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी हिंदळे येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली होती.
ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता, मनोज जाधव यांनी प्रशासकीय मदतीची वाट न पाहता तातडीने पावले उचलली. त्यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले आहे, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तोडून रस्ता मोकळा करण्यात आला, तसेच रस्त्यावर विखुरलेली मोठी खडी हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुयोग्य करण्यात आल्याची माहिती मनोज जाधव यांनी दिली आहे . मनोज जाधव यांनी दाखवलेल्या या सामाजिक दातृत्वामुळे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.












