श्री पंचम खेमराज महाविद्यालय लोककला विभागाच्यावतीने ‘दशावतार महोत्सव’
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व लोककला विभागाच्या वतीने ७ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत चौथ्या ‘दशावतार महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी राजवाड्याच्या निसर्गरम्य पटांगणात दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० या वेळेत हे प्रयोग पार पडणार आहेत.
कोकणची पारंपारिक दशावतार कला जिवंत ठेवणे, तिचे जतन व संवर्धन करणे आणि तरुण पिढीला या कलेची ओळख करून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखमसावंत खेमसावंत भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक:
७ जानेवारी: सायं. ६.३० वा. नाईक मोचेमांडकर मंडळ (नीलमाधव) आणि रात्री ८.३० वा. कलेश्वर दशावतार मंडळ, नेरुर (गोमय गणेश).
८ जानेवारी: सायं. ६.३० वा. दत्त माऊली दशावतार मंडळ, वेंगुर्ला (वेसरोत्पत्ती) आणि रात्री ८.३० वा. जय हनुमान मंडळ, दांडेली (गरुड गर्वहरण).
९ जानेवारी: सायं. ६.३० वा. चेंदवणकर दशावतार मंडळ, कुडाळ (भक्ती महिमा) आणि रात्री ८.३० वा. श्री सिद्धेश्वर मंडळ, दोडामार्ग (चौरंगीनाथ).
१० जानेवारी: सायं. ६.३० वा. चेंदवणकर गोरे मंडळ, कवठी (क्षणमुखासूर रूपिणी संहार) आणि रात्री ८.३० वा. श्री देवी माऊली मंडळ, इन्सुली (धर्मविजय).
या महोत्सवात उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा, खटकेबाज संवाद आणि संगीताची साथ लाभलेले विविध प्रयोग सादर होणार आहेत. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.











