शिवसेना महिला आघाडी आयोजित पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे विजेत्या

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य

संगीता तायशेटे द्वितीय तर सुचित्रा सावंत तृतीय : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयात शहरातील महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे या विजेत्या ठरल्या. संगीता तायशेटे यांना द्वितीय तर सुचित्रा सावंत यांना तृतीय क्रमांक मिळाला.

स्पर्धेतील विजेत्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामंत यांनी महिलांसाठी आयोजित या स्पर्धेचे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.

तांदळापासून पौष्टिक पदार्थ बनविणे या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसादात सहभाग नोंदवत विविध रुचकर आणि आरोग्यदायी पदार्थ सादर केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत महिलांनी आपल्या कल्पकतेने तांदळाचे विविध प्रकार बनवले होते. परीक्षकांनी चव, सादरीकरण आणि पौष्टिक मूल्य या निकषांवर विजेत्यांची निवड केली. स्पर्धेचे परीक्षण स्मृती कांदळकर, विनय गावकर यांनी केले.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, शिवसेना शहर प्रमुख गटनेत्या नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, स्वप्नाली नेरुरकर, मधुरा तुळसकर आणि प्रमिला मोरजे यांच्यासह अन्य शिवसेना महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला स्पर्धक उपस्थित होत्या.