सालपे गावाची स्मार्ट गाव होण्याच्या दृष्टीने वाटचाल, आमदार किरण सावंत यांनी घेतले गाव दत्तक 

ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांच्या प्रयत्नांना येणार यश 

संतोष कोत्रे l      लांजा -: लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील सालपे हे गाव आमदार किरण सामंत यांनी दत्तक घेतले असून सालपे ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांच्या पाठपुराव्यामुळे भविष्यात सालपे गाव स्मार्ट गाव म्हणून उदयास येणार आहे .

गाव भेट दौऱ्या अंतर्गत आमदार किरण सामंत यांनी नुकतीच लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील सालपे गाव आणि ग्रामपंचायतीला भेट दिली होती. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात आणि त्यांचे प्रश्न आमदार किरण सामंत यांनी समजावून घेऊन त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न ,समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

याच दरम्यान सालपे ग्रामपंचायत सदस्य असलेले संकेत घाग यांनी सालपे गाव हा दत्त घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करून गावाला स्मार्ट गाव करावा यासाठी आमदार किरण सामंत यांना निवेदन सादर केले.त्या मध्ये त्यांनी सद्यस्थितीत असलेल्या अनेक समस्या मांडले आहेत. सैनिकांचा गाव अशी ओळख असलेल्या सालपे गावात आजपर्यंत विविध समस्या आहेत. यामध्ये रस्त्यांची दुरावस्था असून येथील धनगर वाडीकडे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही.येथील ग्रामस्थांना पावसाळ्यात चिखलातून पायपिट करायला लागते. त्याचप्रमाणे कदमवाडी येथे नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिक तसेच शाळकरी मुलांची देखील मोठी गैरसोय होते. गावात थ्री फेज लाईन नसल्यामुळे लाईट सतत ये-जा करत असते ,मुबलक पाऊस पडून देखील फेब्रुवारी नंतर पाणी टंचाई समस्या जाणवते .

याच बरोबर रस्त्याला स्ट्रीट लाईट बसवणे, नागरिक आणि मुलांसाठी गार्डनची व्यवस्था करणे, तरुणांसाठी व्यायामशाळा, नदी पार करण्यासाठी पूल आणि रस्त्याची गरज आदी विविध समस्या या निवेदनाद्वारे त्यांनी मांडून आपण हे गाव दत्तक घ्यावे अशी विनंती त्यांनी आमदार किरण सामंत यांना केली

संकेत घाग यांची गावाबाबत असलेली आस्था आणि तळमळ लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी सालपे हे गाव दत्त घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करून गावाला भविष्यात स्मार्ट गाव करून देणार असे त्यांनी ठोस आश्वासन संकेत घाग यांच्यासह ग्रामस्थांना दिले. याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी आमदार किरण यांचे विशेष आभार मानले.

अशाप्रकारे ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांचा पाठपुरावा आणि आमदार किरण सामंत यांनी दिलेले आश्वासन यामुळे भविष्यात सालपे गाव हे लांजा तालुक्यातील पहिले स्मार्ट गाव होण्याच्या दृष्टीने वाटचालीस सुरुवात झाली आहे.