कणकवली ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, येथील एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून आयोजित सामूहिक वाचन उपक्रम आणि दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.१५ जानेवारी पर्यंत वाचन पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आलेले आहे. दरम्यान,बुधवार ७ जानेवारी रोजी सामूहिक वाचनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.गुरुवारी एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर यांनी केले. त्यावेळी सर्व विभागाचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. निरंतर व सतत वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नेमके काय वाचावे? याविषयी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. एस. एस. वायंगणकर यांनी उपस्थित प्राचार्य व सर्व विभाग प्रमुखांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात एकूण ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनात एकूण ८५ ग्रंथांची मांडणी करण्यात आलेली होती. त्यात दुर्मिळ ग्रंथ तुकारामाची गाथा, मोरोपंत चरित्र आणि काव्यविवेचन, यांचाही समावेश करण्यात आलेला होता. तसेच ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथांची मांडणीही त्यात केलेली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक खासदार नारायण राणे , अध्यक्षा सौ नीलमताई राणे,उपाध्यक्ष आमदार निलेश राणे, सचिव मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.









