शालेय नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडीचे आयोजन
राजेंद्र साटम (शिरगांव):
शालेय नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत तसेच मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, स्वच्छता, आरोग्यदायी सवयी तसेच सामाजिक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जि. प. प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथील विद्यार्थ्यांची परिषद किंजवडे येथील अन्नपूर्णा नदी पुलाजवळील आंबोळ ओहोळ येथील श्री लाकम बाग येथे उत्साहात पार पडली.
Vनिसर्गाच्या सान्निध्यात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची मौल्यवान संधी उपलब्ध झाली.
यावेळी कार्यक्रमात बोलताना सरपंच संतोष किंजवडेकर यांनी निसर्गसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निसर्गातील शिस्त, सामूहिकता व स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले. महिला पालक व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमाला सामाजिक एकोप्याची विशेष किनार लाभली. एकूणच, शालेय नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेली ही परिषद विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून निसर्गसंवर्धनाचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचवण्यात कार्यक्रम यशस्वी ठरला.
या परिषदेचे प्रास्ताविक व मार्गदर्शन मुख्याध्यापक गोविंदराव जाधव यांनी केले. त्यांनी निसर्गरक्षण, वृक्षसंवर्धन, पाणी बचत, कचरा व्यवस्थापन तसेच आरोग्यदायी जीवनशैली याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या औचित्याने विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचाही उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश इंगोले यांनी केले.
यावेळी किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर, किंजवडे ग्रामविकास अधिकारी हनुमंत तेरसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप परब, वरेरी ग्रामविकास अधिकारी नागनाथ भिसे, ग्रामविकास अधिकारी विजय मलगुंडे, किंजवडे ग्राम महसूल अधिकारी अमित झाडे, आरे येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आनंद राजम, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र समुदाय अधिकारी संतोष पालवे, शिरगांव–तोरसोळे केंद्रप्रमुख बापू खरात, तोरसोळे शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान चव्हाण, किंजवडे ठाकूरवाडीचे मुख्याध्यापक गोविंदराव जाधव, पदवीधर शिक्षक किरण पवार, शिवराज पुट्टेवाड, योगेश लेंगरे, अंगणवाडी कार्यकर्ती चेतना पाडावे, महिला पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













