अतिवृष्टीत अडथळ्यांची शर्यत पार करत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार : एडगांव येथील घटना

वैभववाडी | प्रतिनिधी : नैसर्गिक आपत्तीत अडथळ्यांची शर्यत पार करत एडगांव ग्रामस्थांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कॉजवेवर आलेल्या पुरातून प्रेत खांद्यावर घेऊन गावक-यांनी मार्ग काढला. गावकऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचे दुःखामध्येही त्या कुटुंबाने आभार व्यक्त केले.
एडगांव रामेश्वरवाडी येथील अशोक गणपत रावराणे वय 65 यांचे आकस्मित मुंबई येथे निधन झाले. त्यांचा मृतदेह गावी शनिवारी सकाळी आणण्यात आला. सकाळी पाऊस मुसळधार सुरू होता. घरातील सर्व विधी होईपर्यंत पुराच्या पाण्यात कॉजवे गेला होता. गावकऱ्यांनी पुरातून मार्गक्रमण करत मृतदेह स्मशानभूमीत नेला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत अशोक रावराणे हे भाजपा पदाधिकारी व शासकीय ठेकेदार सुनील रावराणे यांचे चुलत बंधू होत. अशोक रावराणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, चुलत भाऊ व नातवंडे असा मोठा परिवार आहे.