लांजा तालुक्यातील पूनस वरची गुरववाडी येथील घटना
बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
लांजा | प्रतिनिधी : गोठ्यात घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा महिन्याच्या वासराचा मृत्यू झाला. ही घटना लांजा तालुक्यातील पुनस वरची गुरववाडी येथे शुक्रवारी २१ जुलै रोजी रात्री घडली आहे .या घटनेनंतर येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील पुनस वरची गुरववाडी या ठिकाणी लोकवस्तीपासून काहीशा अंतरावर सात ते आठ ग्रामस्थांचे लागूनच गोठे आहेत. यातील सिताराम गणपत गुरव यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने शुक्रवारी रात्र हल्ला चढवला. यावेळी गोठ्यात अन्य मोठी गुरे देखील होती. बिबट्याने गोठ्याला दरवाजा म्हणून बसवलेली कवाडी बाजूला करून त्यातून आत प्रवेश केला आणि सहा महिन्याच्या वासराला दाव्या सहित ओढत जंगलात घेऊन गेला. गोठ्यापासून साधारणपणे एक किमीच्या अंतरावर या बिबट्याने वासराला नेले आणि त्या ठिकाणी त्याला ठार मारले.
सकाळी सिताराम गुरव हे गोठ्यात आले असता त्यांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर जवळच त्यांनी जंगलात जाऊन पाहिले असता हे वासरू मृतावस्थेत आढळून आले .या प्रकरणी लांजा वनविभागाला माहिती देण्यात आली आहे .दरम्यान बिबट्याच्या या हल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .सध्या भात शेतीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत बिबट्याचा मानवी वस्तीकडे ओढा वळल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.












