सावंतवाडी । प्रतिनिधी : संस्कृत ही अनेक भाषांची जननी असून जगातील अनेक विकसित राष्ट्रांनी या भाषेचा स्वीकार केला आहे. या भाषेच्या प्रसार आणि संवर्धनासाठी अटल प्रतिष्ठान राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून जिल्ह्यातील शाळांमधून संस्कृतचा जागर झाला पाहिजे, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी केले.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून अटल प्रतिष्ठानतर्फे आयोजित आणि डॉ. नितीन पावसकर प्रायोजित जिल्हास्तरीय शालेय संस्कृत स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. येथील महादेव उर्फ भास्कर नारायण पावसकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी विशेष अतिथी डॉ. अमुल पावसकर यांनी शालेय अभ्यासक्रमात संस्कृत भाषा सक्तीची करण्याची आवश्यकता व्यक्त केली. डॉ. राजेश नवांगुळ यांनी संस्कृतमुळे उच्चार शुद्ध होतात, असे सांगितले. तर प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
स्पर्धेत जिल्ह्यातील ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्यांना बांबूपासून बनवलेली स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
स्तोत्रपठन: प्रथम- जुई हर्डीकर (बांदा), द्वितीय- मिरा जोग (सावंतवाडी), तृतीय- ओम गवस (सावंतवाडी).
गीतगायन: प्रथम- आर्य माणगावकर (माणगाव), द्वितीय- सानवी देसाई (बांदा), तृतीय- श्रुती तावडे (कणकवली).
कथाकथन: प्रथम- प्रज्ञा मौर्य (बांदा), द्वितीय- मनस्वी आरोलकर (कणकवली), तृतीय- तनिष्का राऊळ (मळगाव).
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सॅकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. कादंबरी पावसकर, अॅड. अनुराधा परब, प्राचार्य भारमल व प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. परीक्षणाचे काम वृंदा आठलेकर-काजरेकर व विवेकानंद जोशी यांनी पाहिले. सूत्रसंचालन अर्पिता वाटवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तृप्ती पार्सॅकर व ज्योती राऊळ यांनी परिश्रम घेतले.











