वेंगुर्ले l प्रतिनिधी :विरार मुंबई येथे नुकत्याच झालेल्या स्टेअर्स राज्य युवक क्रीडा स्पर्धा – पश्चिम महाराष्ट्र कराटे अजिंक्यपद स्पर्धा २०२५–२६ या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत आरवली येथील कु. संस्कृती संजय मोरजकर हिने चमकदार कामगिरी करीत दोन पदके पटकावली.
संस्कृतीने अंडर–१५ वयोगटातील ३५ किलो वजन गटात कुमिते प्रकारात सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच काता प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत ब्राँझ पदक मिळवले.
ही स्पर्धा ग्रीन पॅलेस रिसॉर्ट, अर्नाळा बीच, विरार येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा होत असताना संस्कृतीने दाखवलेले कौशल्य व चिकाटी उल्लेखनीय ठरली. संस्कृतीच्या या यशामध्ये तिचे प्रशिक्षक श्री. किरण देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्कृतीचे वडील श्री. संजय उर्फ सनी मोरजकर हे मौजे सखैलेखोल गावाचे पोलीस पाटील असून मुलीच्या या यशाने संपूर्ण गावाचा अभिमान वाढविला आहे. या स्पर्धेतील उज्वल कामगिरीच्या आधारे संस्कृतीची पुढील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून ती स्पर्धा दिल्ली येथे होणार आहे.
संस्कृतीच्या या यशाबद्दल प्रशिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील स्पर्धांतही ती आणखी मोठे यश संपादन करील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













