गोपाळ चौकेकर यांना बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर 

चौके हायस्कूल येथे 17 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित

चौके – प्रतिनिधी :- मालवण तालुक्यातील कट्टा दशक्रोशीतील आदर्श व्यक्तिमत्व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै.बापूभाई शिरोडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार यावर्षी चौके गावातील सुपुत्र श्री गोपाळ सहदेव चौकेकर यांना जाहीर झाला आहे.. हा पुरस्कार शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भ ता चव्हाण म. मा विद्यालय चौके येथील जयप्रकाश हॉल येथे चौके हायस्कूल स्थानिक समिती अध्यक्ष विजेंद्र गावडे, निवृत्त ज्येष्ठ शिक्षक सदाशिव गावडे गुरुजी,स का पाटील महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक सुमेधा नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

 

गोपाळ चौकेकर चौके गावचे रहिवासी असून गेली अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. चौके हायस्कूल येथे कर्मचारी म्हणून सध्या कार्यरत आहेत ते स्वभावाने नम्र असून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी अग्रेसर असतात. सन 2007 मध्ये ते मालवण पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना न्याय दिला होता. विकासाच्या अनेक योजना आपल्या कार्यकाळात करून घेतल्या होत्या. दारिद्र्यरेषेखाली लोकांना अर्थसाहाय्य, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ,रेशन कार्ड, नियमित लागणारे दाखले शाळकरी मुलांना लागणारे दाखले, पेन्शन योजनेचा लाभ अनेकांना मिळवून दिला. चौके गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून मागील दोन वर्ष उत्कृष्ट काम केले. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा अपंग संस्थेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला. जिल्हा व तालुका समिती सदस्य म्हणून काम केले आहे.पंचक्रोशीत तसेच तालुक्यात गोपाळ मामा म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत.

 

गोपाळ चौकेकर यांच्या या कार्याचा गौरव बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचा या वर्षीचा बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे पुरस्काराचे हे 25 वे वर्ष आहे

 

या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन बापू तळवडेकर,वैष्णवी लाड, श्याम पावसकर, किशोर शिरोडकर, दीपक भोपटे विकास म्हाडगूत यांनी बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्यावतीने केले आहे.