माजी तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर यांना शिवसेनेत प्रवेश देत स्विकृत नगरसेवक पदी निवड
महाविकास आघाडीकडून महेश शिवलकर यांची होणार निवड
राजापूर (प्रतिनिधी): जिल्हयाच्या राजकारणातील किंग मेकर अशी ओळख असलेल्या राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष व नुकत्याच झालेल्या न. प. च्या निवडणूकीत प्रभाग क्रमांक चार मधून काँग्रेसकडून निवडणूक लढवून पराभूत झालेले माजी नगरसेवक सुभाष उर्फ बंडया बाकाळकर यांना राजापूर नगर परिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारी देत काँग्रेसला धक्का दिला आहे.
आ. किरण सामंत यांच्या या धक्कातंत्राने स्विकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या त्यांच्या पक्षातील अनेक इच्छुकांनाही धक्का बसला आहे.
राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी १३ रोजी निवडणूक होत आहे. तर याच दिवशी दोन स्विकृत नगरसेवकांची नावे जाहिर केली जाणार आहेत. नगर परिषदेत सत्ताधारी काँग्रेस महाविकास आघाडीने शहर विकास आघाडी म्हणून गटाची नोंदणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तर शिवसेना भाजपाकडूनही आपल्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. दोघांकडूनही प्रत्येकी एक एक स्विकृत नगरसेवक होणार आहे. यासाठी त्या त्या पक्षांच्या गटनेत्यांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी १२ जानेवारी पर्यंत नावांसह प्रस्ताव दाखल करावयाचे होते.
महाविकास आघाडीकडून शुक्रवारीच ज्येष्ठ पत्रकार व राजापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर यांचे नाव जाहिर करून त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मंगळवारी या दोन्ही स्विकृत नगरसेवकांच्या निवडीची घोषणा होणार आहे.
शिवसेनेकडून यापुर्वी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर डॉ. शुभम कुशे यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती. मात्र यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवार पर्यंत शिवसेनेकडून कुणाचेही नाव जाहिर करण्यात आले नव्हते. प्रस्ताव दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी आ. किरण सामंत यांनी धक्कातंत्राचा वापर करत या पदासाठी सुभाष बाकाळकर यांच्या नावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकड दाखल केला आहे. शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे यांनी सोमवारी हा प्रस्ताव दाखल केला आहे.
सुभाष बाकाळकर यांनी यापुर्वी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून पाच वर्षे काम केलेले आहे. तर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. तर नुकत्याच झालेल्या न. प. च्या पंचवार्षिक निवडणूकीत बाकाळकर यांनी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा शिवसेनेचे दिलीप अमरे यांनी पराभव केला होता.
आता बाकाळकर यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करत स्विकृत नगरसेवकपद पटकावले आहे. आ. किरण सामंत हे सध्या मुंबईत असून त्यांनी याबाबत मुंबईतुन सुत्रे हलवत बाकाळकर यांनी स्विकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी देत काँग्रेसला धक्का दिला आहे.
फोटो महेश शिवलकर, सुभाष बाकाळकर











