विद्यार्थ्यांनी अनुभवला पोलीस स्टेशनचा कारभार!
मसुरे | झुंजार पेडणेकर
पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेने मालवण पोलीस स्टेशनला भेट देऊन विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा अनुभव दिला. २ ते ८ जानेवारी या कालावधीत मालवण पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पोलीस खात्यातील विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व मार्गदर्शन, घातक पदार्थ व बॉम्ब शोध यंत्रांचे प्रदर्शन व मार्गदर्शन, पोलीस स्टेशन व्यवस्थापन व कारभाराचे मार्गदर्शन, पोलीस बँड पथकाचे वादन इत्यादी उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पोलीस स्टेशनच्या या सर्व उपक्रमांची ओळख व माहिती मिळावी याकरिता मालवण पोलीस स्टेशनच्यावतीने ओझर विद्यामंदिर कांदळगाव या ग्रामीण भागातील प्रशालेला खास निमंत्रित केले होते. या क्षेत्रभेटीमध्ये ओझर विद्यामंदिर प्रशालेचे ४८ विद्यार्थी व त्यांच्या समवेत ज्येष्ठ शिक्षक ए. ए. शेर्लेकर, एस. जे. सावंत व प्रभारी मुख्याध्यापक सहभागी झाले होते.
मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री भोसले यांनी विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक कक्ष, ठाणे अंमलदार व बिनतारी संदेश कक्ष, अधिकारी कक्ष, बारनिशी व कारकून कक्ष, ट्रेझरी आणि पोलीस कोठडी तसेच, गोपनीय आणि गुन्हे संकलन गुन्हे अन्वेषण इत्यादी विभागाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.
पोलिस स्थापना दिन म्हणजेच रेझिंग डेचे औचित्य साधून डॉ. मोहन दहिकर, पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात पोलीस दलाच्या आधुनिक शस्त्रास्त्रांविषयी पोलीस हवालदार सुधीर लोंढे व बॉम्बशोधक यंत्रांविषयी पोलीस हवालदार संजय शिरटीकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक सुरक्षा, सजगता व सामाजिक शांततेबद्दलच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली.
या कार्यक्रमप्रसंगी मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री भोसले, बॉम्बशोधक नाशक पथकाचे पोलीस हवालदार संजय शिरटीकर ,शस्त्र प्रशिक्षक पोलीस हवालदार सुधीर लोंढे, श्री. पाटील, महिला पोलीस हवालदार सुप्रिया पवार, भरोसा सेल सिंधुदुर्ग ओरोसच्या महिला पोलीस हवालदार साक्षी खोपकर,डायल ११२ सिंधुदुर्ग ओरोसच्या पोलीस हवालदार रागिणी पालकर,पोलीस बँड विभाग सिंधुदुर्गचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री गोन्साल्विस आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था मालवण पोलीस स्टेशनच्यावतीने विशेष पोलिस बसद्वारे केल्याबद्दल आणि उपक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल ओझर विद्यामंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून मालवण पोलीस स्टेशनचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार सुशांत पवार यांनी केले. तर आभार पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी मानले.














