वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दारूबंदी कायद्यांतर्गत १३ गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारूविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. २२ आणि २३ मे २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत दारूबंदी कायद्यांतर्गत जिल्ह्यात एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, गावठी हातभट्टी, देशी व गोवा बनावटीच्या दारूसह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापुचेतळे येथे बंद दुकानाच्या गाळ्यामागे रोहन भागेश गोरे याला बिगरपरवाना विक्रीच्या उद्देशाने गोवा बनावटीची व देशी दारू बाळगल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले; त्याच्याकडून किंग फिशर कॅन, हनि ब्लेन्ड, रॉयल स्टँग व्हिस्की आणि देशी दारू असा एकूण ४,९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने कशेळी बांध येथे कारवाई करत दशरथ मुरारी फोडकर याच्याकडून ९०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या ‘डॉक्टर ब्रँड’ दारूच्या ३० बाटल्या जप्त केल्या, तर कुवेशी नार्वेकरवाडी येथे सुदेश दत्ताराम नार्वेकर याला ७५० रुपये किमतीच्या महाराष्ट्र बनावटीच्या दारूच्या ५ बाटल्यांसह ताब्यात घेतले. नाटे पोलिसांनीच तिसऱ्या कारवाईत वाडा पालये येथील एस.टी. पिकअप शेडजवळ दिलीप श्रीकृष्ण पेडणेकर याला ८२० रुपये किमतीच्या ८ लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह अटक केली. दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फणसु निकमवाडी रस्त्याशेजारी रघुनाथ बाळु मांडवकर याला १,००० रुपये किमतीच्या १० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह पकडण्यात आले. जयगड सागरी पोलिसांनी जयगड बौद्धवाडी ते गणेशवाडी रस्त्यालगत झाडाच्या आडोशाने सादिक आदम सोलकर याला ८२० रुपयांच्या ८ लिटर हातभट्टीच्या दारूसह ताब्यात घेतले.
चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाग गोरीवलेवाडी येथील गल्लीत सुदेश बारकू भोजने याला स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे गावठी दारू बाळगल्याप्रकरणी अटक करून, त्याच्याकडून १,९३० रुपयांची १९ लिटर गावठी दारू व प्लास्टिक ग्लास जप्त करण्यात आला. देवरूख पोलिसांनी किरबेट बौद्धवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ विजय गंगाराम पवार याला लोकांना विक्री करण्यासाठी दारू बाळगल्याप्रकरणी ९५० रुपयांच्या ९ लिटर हातभट्टीच्या दारूसह पकडले. रत्नागिरी शहर पोलिसांनी भाटये गावातील खोतवाडीत रस्त्याच्या बाजूला कंपाउंडच्या आडोशाने अशोक बाळकृष्ण पोतदार याला ५२० रुपयांच्या ५ लिटर गावठी दारूसह अटक केली. तर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कुरतडे पालवकरवाडी येथे आंब्याच्या झाडाखाली यशवंत तुकाराम पालवकर (वय ७०) या वृद्ध आरोपीला ९०० रुपये किमतीच्या ९ लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह ताब्यात घेतले. या सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय, सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडप रोड येथील मैदानात दारू पिण्याचा परवाना (लायसन्स) नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यात उमेश कमलाकर साळवी (रा. असुर्डे), अमेय अनिल मोरे (रा. नांदगाव) आणि राज रविंद्र गुरव (रा. असुर्डे) या तिघांना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध दारूचा सुळसुळाट मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ही कडक कारवाई केली असून, पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी करत आहेत













