कविलकाटे येथे माघी गणेश जयंतीनिमित्त तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक उत्सव

आज होणार बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा “प्रारब्ध” हा नाट्यप्रयोग

स्वप्निल कदम l कुडाळ :कुडाळ तालुक्यातील कविलकाटे येथील श्री सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा होत आहे. यंदा या उत्सवाचे २८ वे वर्ष असून, या निमित्ताने श्री सिद्धी गणपती देवस्थान कविलकाटे यांच्या वतीने २० ते २२ जानेवारी या कालावधीत भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सद्गुरु श्री वामनराव पै जीवन विद्या मिशन, कविलकाटे शाखेच्या वतीने नामस्मरण, हरिपाठ व प्रवचन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धी गणपतीची आरती, रात्री ८ वाजता श्री सिद्धी गणपती प्रासादिक भजन मंडळ, कविलकाटे (बुवा सिद्धार्थ पावसकर) यांचे भजन, तर रात्री ९ वाजता श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, बांबुळी (बुवा सुशांत बांबुळकर) यांचे भजन होणार आहे. रात्री १० वाजता बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा “प्रारब्ध” हा नाट्यप्रयोग सादर होणार असून, या कार्यक्रमाचे सौजन्य सुवर्णा बाळा पेडणेकर, कविलकाटे यांचे आहे.

बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आरती, सायंकाळी ७ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, कविलकाटे (मधलीवाडी) यांचे सुश्राव्य भजन (बुवा प्रभाकर उर्फ बाळा गडेकर) होणार आहे. रात्री ८ वाजता स्थानिक मुलांचे रेकॉर्ड डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मुख्य उत्सव दिन गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजता श्री व सौ. सुवर्ण बाळ पेडणेकर उभयंतांकडून श्रींची पाद्यपूजा होईल. सकाळी ६ ते ९ या वेळेत जीवन विद्या मिशन तर्फे गणेश नामस्मरण, सकाळी १० वाजता ह.भ.प. श्री लक्ष्मण नेवाळकर बुवा यांचे गणेश जन्मावर आधारित कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता गणेश जन्म सोहळा, महाआरती, सामुदायिक प्रार्थना व गाऱ्हाणे, तर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी २ वाजता स्थानिक भजने, दुपारी ३ वाजता महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम, सायंकाळी ३.३० वाजता श्रीदेवी चामुंडेश्वरी महिला फुगडी मंडळ व सायंकाळी ४.३० वाजता श्री देव सिद्धी गणपती महिला फुगडी मंडळ यांची फुगडी सादर होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता महाआरती, तर सायंकाळी ६ वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, खानोली यांचा “चैत्र पौर्णिमा” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. रात्री १० वाजता गोव्यातील सुप्रसिद्ध श्री साई दामोदर घुमट आरती मंडळ, मडगाव (गोवा) यांचा घुमट आरती व गायन कार्यक्रम होणार असून, गायक शुभम नाईक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सौजन्य आशिष गुरुनाथ दळवी व स्वप्निल प्रभाकर दळवी यांचे आहे.

माघी गणेश जयंतीनिमित्त आयोजित या तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धी गणपती देवस्थान कविलकाटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.