एडगाव शाळेत पतंग बनविणे उपक्रम

पतंगावर शुभ्रा सावंत हिचा मराठी शाळा वाचवण्याचा संदेश

वैभववाडी l प्रतिनिधी :मकरसंक्राती निमित्त श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगांव नं १ शाळास्तरावर पतंग बनविणे हा उपक्रम राबविला जात असताना इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या शुभ्रा हिने तयार केलेल्या पतंगावर लिहिलेला संदेश सर्वांनाच अंतर्मुख होण्यास भाग पाडणारा ठरला आहे.
सद्यस्थितीत एकीकडे जिल्हापरिषदेच्या मराठी शाळांमधील घटत चाललेली पटसंख्या आणि त्यामुळे शाळांवर असलेली टांगती तलवार यामुळे सर्वसामान्य पालकांच्या समोर आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच इंग्रजी शाळांचे आकर्षण यामुळे काही पालक आपल्या मुलांना खाजगी इंग्रजी शाळेत दाखल करण्यास आग्रही असताना दिसत आहेत. राष्ट्रिय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणास अनन्य साधारण महत्त्व दिले असताना देखील एकूण परिस्थितीचे चित्र बदलताना दिसत नाही. अशा एकूण परिस्थितीवर चिमुकल्या शुभ्रा सावंत हिने दिलेला संदेश नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने संदेशात ” शाळा मराठी माझी, शाळा मराठी गे …मराठी शाळांमध्ये शिक्षण घेतल्याने आत्मविश्वास वाढतो व दुसरी भाषा अवगत होण्यास सुलभ जाते. मराठी शाळा वाचवा | संस्कृती वाचवा | मराठी जगवा | ” असे आवाहन केले आहे. यासाठी तिला वर्गशिक्षिका दिव्या भोसले, नेहा पवार, मुख्याध्यापिका दिप्ती पाटील व पालक पूजा व प्रभाकर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी देखील तिने चांद्रयान यासारखी प्रतिकृती बनवत आपल्या कल्पनाशक्तीची झलक दाखवली होती. या तिच्या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.