रत्नागिरी : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नुकतेच एका अनपेक्षित विमान अपघातात निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यावरही शोककळा पसरली आहे. आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नेतृत्वाने सर्वांना आपलेसे करणाऱ्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवार, ३१ जानेवारी रोजी रत्नागिरीत सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ जानेवारी रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. स्वर्गीय अजित दादांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संस्थांचे सदस्य, वकील, डॉक्टर्स, बिल्डर्स, हॉटेल असोसिएशन, सर्व मंडळे, ट्रस्ट आणि व्यापारी आस्थापनांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या शोकसभेच्या माध्यमातून रत्नागिरीची जनता आपल्या जननायकाला अखेरचा निरोप देणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी तालुका आणि शहर यांच्या वतीने आयोजित केलेली ही शोकसभा शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेशच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये संपन्न होणार आहे. या शोकसभेला रत्नागिरीतील सर्वसामान्य जनतेसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











