चिपळूण: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आलेली मरगळ अद्याप कायम आहे. दोन दिवसांच्या खंडानंतर उमेदवारांनी प्रचाराला पुन्हा सुरुवात केली असली, तरी पूर्वीसारखा जोश आणि उत्साह आता दिसत नाहीये. सोशल मीडियावरील डिजिटल पोस्टचा ओघही पूर्णपणे थंडावला असून शांततेत प्रचार करण्यावर भर दिला जात आहे.
या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट आणि मुख्य लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून, शिवसेना-भाजप युतीनेही आपली ताकद पणाला लावली आहे. याशिवाय ठाकरे सेनेने देखील बहुतांश गटांत आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणुकीची आकडेवारी आणि चुरशीचे गट
• जिल्हा परिषद: ९ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात आहेत.
• पंचायत समिती: १८ जागांसाठी ५५ उमेदवारांमध्ये मुकाबला होत आहे.
• चुरशीचे गट: तालुक्यातील सावर्डे, शिरगाव, उमरोली, खेर्डी आणि रामपूर या जिल्हा परिषद गटांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत.
विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने चिपळूणमधील राजकीय वातावरण बदलले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची चिपळुणातील नियोजित सभा रद्द करण्यात आली होती. गेले तीन दिवस प्रचाराची मोहीम पूर्णपणे थंडावलेली होती, जी आता पुन्हा सुरू झाली आहे.
आमदार शेखर निकम यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर ते स्वतः आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. उमेदवारांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रचाराची रणनीती आखण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.











