शिरगांव (प्रतिनिधी) –
देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी संप्रदाय मंडळाच्यावतीने शिरगांव बाजारपेठेतील हनुमान मंदिरात रविवार, ८ फेब्रुवारी रोजी गंगापूजन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरगांव वारकरी संप्रदायाची माघवारी पायी दिंडी पंढरपूरहून शिरगांव येथे परतल्यानंतर दरवर्षी परंपरेनुसार हनुमान मंदिरात गंगापूजनाचा सोहळा साजरा केला जातो. त्यानुसार यंदाही हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने साजरा होणार आहे.
रविवारी सकाळी ८ वाजता गंगापूजन, सकाळी ९ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. दुपारी ३ वाजता रामनगर येथील पावणाई बांदेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे सुस्वर भजन सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता असलदे गांवठण येथील भजन मंडळाचे भजन, तर रात्री १० वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
या गंगापूजन सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












