१ लाख ३८ हजार ९२४ मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य
खेड (राकेश कोळी) – खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील ७ जिल्हा परिषद जागा आणि त्याअंतर्गत असलेल्या १४ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत असून, या निवडणुकीत एकूण ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी २० उमेदवार तर पंचायत समिती गणांसाठी ५३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांचे राजकीय भवितव्य १ लाख ३८ हजार ९२४ मतदार ठरवणार आहेत.
निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यात एकूण ११४ ग्रामपंचायती असून त्या अंतर्गत २१५ गावे येतात. या गावांतील मतदारांसाठी २०१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून तालुक्यातील एकूण मतदारसंख्येपैकी ६८ हजार २०६ पुरुष मतदार असून ७० हजार ७१८ महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याने यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची म्हणजे लाडक्या बहिणींची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
खेड तालुक्यातील सुकिवली, भरणे, भडगाव, दयाळ, विराचिवाडी, लोटे आणि धामणदेवी हे सात जिल्हा परिषद गट आहेत. या सातही गटांखाली प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण १४ पंचायत समिती गण येतात. सुकिवली गटाखाली सुकिवली व तिसंगी, भरणे गटाखाली खवटी व भरणे, भडगाव गटाखाली भडगाव व जामगे, दयाळ गटाखाली दयाळ व बहिरवली, विराचिवाडी गटाखाली गुणदे व विराचिवाडी, लोटे गटाखाली लोटे व आंबडस, तर धामणदीवी गटाखाली अंजणी व धामणदेवी या पंचायत समिती गणांचा समावेश आहे.
गटनिहाय पाहता सुकिवली गटात १९ ग्रामपंचायती, ४२ गावे व ३२ मतदान केंद्रे असून येथे १८ हजार ७४७ मतदार आहेत. भरणे गटात १४ ग्रामपंचायती, २३ गावे व २८ मतदान केंद्रे असून १९ हजार ३६८ मतदार आहेत. भडगाव गटात १४ ग्रामपंचायती, २३ गावे व ३० मतदान केंद्रे असून येथे २१ हजार २०२ मतदार आहेत. दयाळ गटात १९ ग्रामपंचायती, ३५ गावे व ३० मतदान केंद्रे असून २१ हजार ४०० मतदार मतदान करणार आहेत. विराचिवाडी गटात १७ ग्रामपंचायती, २८ गावे व २८ मतदान केंद्रे असून १८ हजार ६४० मतदार आहेत. लोटे गटात १६ ग्रामपंचायती, ३७ गावे व ३० मतदान केंद्रे असून २० हजार ०४० मतदार आहेत, तर धामणदीवी गटात १५ ग्रामपंचायती, २७ गावे व २३ मतदान केंद्रे असून येथे १९ हजार ५२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान अधिकारी व कर्मचारी सज्ज आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सकाळपासूनच मतदानास सुरुवात होणार असून, या मतदानातून खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेतृत्व ठरवणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.













