ज्ञानदीप भडगावच्या पलक कोकाटे व आर्यन धाणक यांची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड

विभागीय स्पर्धेत ज्ञानदीपच्या १९ वर्षांखालील संघाचा द्वितीय क्रमांक; बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) येथील दोन विद्यार्थ्यांनी नेटबॉल क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रशालेच्या १९ वर्षांखालील संघाने विभागीय नेटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. या संघातील इयत्ता अकरावी विज्ञान जेईई वर्गातील पलक वैभव कोकाटे आणि आर्यन संतोष धाणक यांची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २० व २१ नोव्हेंबर रोजी सातारा क्रीडा संकुल येथे विभागीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ज्ञानदीप भडगावच्या १९ वर्षांखालील संघाने प्रतिस्पर्धी संघांसमोर दमदार खेळाचे प्रदर्शन केले. संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, चपळता, अचूक पासिंग आणि खेळातील कौशल्याच्या जोरावर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून प्रशालेचा नावलौकिक वाढविला.
या विभागीय स्पर्धेत पलक कोकाटे आणि आर्यन धाणक यांनी विशेष प्रभावी कामगिरी केली. त्यांच्या खेळातील कौशल्य, मेहनत, चिकाटी आणि संघभावनेची दखल घेत या दोन्ही खेळाडूंची २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या यशामागे खेळाडूंची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विभागीय स्पर्धेतील यशानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेतही ज्ञानदीपच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळातील सदस्यांनी अभिनंदन केले.
ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पलक कोकाटे आणि आर्यन धाणक यांच्यासह संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरावरही या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखावी आणि ज्ञानदीपच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर घालावी, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.