देवगड / प्रतिनिधी
आंबा बागायतदार व व्यापारी संघामार्फत तालुक्यातील बागायतदार व व्यापाऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने विविध मागण्या निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या असून त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा व बागायतदारांना या संकट काळात योग्य दिशा मिळण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे आंबा बागायतदारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला बागायतदारांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष काका ढोके यांनी पत्रकार परिषदेतून केले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष विनय पाडावे, सदस्य रविकांत झरकर, तुषार पाळेकर, किरण टेंबुलकर, तेजस मामघाडी, गणेश गावकर आदी उपस्थित होते. श्री. ढोके म्हणाले, बागायतदारांच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, देवगड तहसीलदार रमेश पवार, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांना देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेऊन शासनाने बागायतींच्या पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र केवळ पंचनामे करून प्रश्न सुटणार नाहीत. बागायतदाराला पूर्ण कर्जमाफी, ठोस व भरघोस नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. यावर्षी आंबा बागायतदारांचे नुकसान अत्यंत मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अशा परिस्थितीत केवळ कागदी दिलासा नको. तर प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि शासनाचा ठोस निर्णय आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय जाहीर होईपर्यंत आणि आदेश प्रत्यक्षात लागू होईपर्यंत हा लढा आम्ही सुरुच ठेवणार आहेत. हा लढा आमच्या हक्कांसाठी आहे, आमच्या अस्तित्वासाठी आहे. ठोस निर्णय झाला, तर आम्ही स्वागत करू. अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करू, असा इशाराही श्री. ढोके यांनी दिला आहे.











