न्यू इंग्लिश स्कूल कळंबट येथे दहावीच्या मुलांना दिला निरोप
चिपळूण (वार्ताहर) : आपल्या शाळेला सोडून जाताना आणि गुरुजनांचा निरोप देताना निश्चितच मन भरून येते. शाळा म्हणजे जीवनाला दिशा व आकार देणारे ज्ञानमंदिर आहे. त्यामुळे आपल्या शाळेकडे परतून पाहा आणि प्रत्येकाने आदर्श नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन संस्थेचे संचालक ॲड संतोष कुळे यांनी केले.
तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल कळंबट येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उद्योजक अशोक वनगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना श्री. कुळे म्हणाले की, दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी स्वतःचे आरोग्य परीक्षेच्या काळात सांभाळा. पूरक आहार घ्या. अभ्यासाचे वेळापत्रक ठरवा आणि कॉपी मुक्त पेपर लिहा अशा महत्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळेचे ऋण कधीच विसरू नका असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी माजी विद्यार्थी सचिन घाणेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दरवर्षी प्रमाणे कुणबी युवा चिपळूण यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना छोटी भेट वस्तू देण्यात आली.
दहावीतील मुलांनी आपल्या मनोगतातून शाळा आणि शिक्षक यांच्या प्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला उद्योजक अशोक वनगे, ॲड संतोष भाई कुळे, सचिन घाणेकर, श्री पांडे, मुख्याध्यापक श्री. शिरकर, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी केले.












