रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाट्ये येथे 28 हजार 125 रुपयांच्या 562.5 ग्रॅम वजनाच्या गांजा सदृश्य अमली पदार्थासह एकाला गुन्हे प्रकटीकरण पथकाने गजाआड केले. ही कारवाई सोमवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा.सुमारास करण्यात आली.
इस्माईल सत्तार दर्वे (48,रा.मुरकरवाडी भाट्ये,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी दुपारी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक सागर शिंदे व पोलिस अंमलदार शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते. ते भाट्ये येथील नेव्हल ऑफीसच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित इस्माईल दर्वे हा त्याठिकाणी संशयास्पद हालचाल करताना दिसून आला. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला जागीच थांबवून त्याची चौकशी करत अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडून गांज्ाा सदृश्य अमली पदार्थाच्या 562.5 ग्रॅम वजनाच्या 39 पारदर्शक प्लास्टिक पिशव्या मिळून आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस ॲक्ट कलम 8 (क),20(ब),(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक नितिन बगाटे,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे,पोलिस उपनिरीक्षक सिध्दी सावंत,सहाय्यक पोलिस फौजदा दिपक साळवी,पोलिस हेड काँस्टेबल अमोल भोसले,भालचंद्र मयेकर,पोलिस काँस्टेबल अमित पालवे,महिला पोलिस हेड काँस्टेबल पुनम ढवळ आणि पोलिस काँस्टेबल किरण डांगे यांनी केली.












