रत्नागिरी: प्रभाग १५ मधील ‘राम आळी’ विकासकामांना मंजुरी

परशुराम (दादा) ढेकणे यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी: शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील राम आळी परिसरातील विविध विकासकामांना शासनाकडून अधिकृत मंजुरी मिळाली असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही सर्व कामे सामाजिक कार्यकर्ते परशुराम (दादा) ढेकणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे मार्गी लागली आहेत. या विकासकामांसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या मंजुरीमध्ये प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ते डांबरीकरण, गटार व्यवस्था सुधारणे, नवीन स्ट्रीट लाईट बसवणे आणि इतर आवश्यक नागरी सुविधांशी संबंधित कामांचा समावेश आहे. या विकासकामांच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. या संदर्भात बोलताना परशुराम (दादा) ढेकणे यांनी सांगितले की, “प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि समस्या लक्षात घेऊन आम्ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे ही कामे मंजूर झाली असून, येणाऱ्या काळातही प्रभागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”

या मंजुरीमुळे प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांना आता अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत परशुराम ढेकणे आणि सर्व संबंधित नेत्यांचे आभार मानले आहेत.