जानवली येथील श्री लिंगेश्वर पावणाई देवी देवस्वारीची साळशी देवस्थानला भेट

श्री क्षेत्र कुणकेश्वरचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात पारंपरिक भेट

शिरगाव (प्रतिनिधी)
कणकवली तालुक्यातील जानवली येथील श्री लिंगेश्वर पावणाई देवी देवस्थानची देवस्वारी रविवार, १५ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे देवदर्शन व तीर्थस्नानासाठी रवाना झाली होती. परतीच्या प्रवासात मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी परंपरेनुसार देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानास भक्तिभावाने भेट देण्यात आली.

महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे विविध गावांतील देवस्वाऱ्या देवदर्शन व तीर्थस्नानासाठी जात असतात. तब्बल ३३ वर्षांनंतर जानवली येथील श्री लिंगेश्वर पावणाई देवी देवस्थानची देवस्वारी श्री कुणकेश्वर येथे भेटीस व तीर्थस्नानासाठी गेल्यामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री कुणकेश्वर येथे देवदर्शन व तीर्थस्नान करून देवस्वारी परतीस निघाली. ढोल-ताशांच्या गजरात व जयघोषात ही देवस्वारी दुपारी साळशी येथे दाखल झाली. येथे पारंपरिक पद्धतीने इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानास भेट देण्यात आली. यावेळी देवस्वारीचे उत्स्फूर्त व पारंपरिक स्वागत करण्यात आले.

देवस्वारीसोबत आलेल्या असंख्य भाविकांनी देवदेवतांचे दर्शन घेतले. भाविकांसाठी लाडू व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर देवस्वारी जानवलीकडे प्रस्थान झाली.

फोटो कॅप्शन :जानवली येथील श्री लिंगेश्वर पावणाई देवी देवस्थानची देवस्वारी साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानास पारंपरिक भेट देताना.