जीवनकार्य उलगडणारा रथ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आज इतिहासाचे साक्षीदार ठरणारे क्षण अनुभवायला मिळाले. शीख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादुर सिंग यांच्या ३५० व्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा पट उलगडणारा विशेष रथ येथे दाखल झाला. या रथाच्या माध्यमातून त्यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मरक्षणासाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती नागरिकांसमोर मांडण्यात आली.
सतराव्या शतकात मुघल सत्तेखालील भारतात धार्मिक अत्याचारांचा काळ सुरू होता. त्या वेळी बादशहा औरंगजेब यांच्याकडून हिंदू धर्मीयांवर जबरदस्तीने धर्मांतर व अन्यायकारक कारवाया केल्या जात होत्या. या जुलमी धोरणांच्या विरोधात उभे राहत गुरु तेग बहादुर सिंग यांनी धर्मस्वातंत्र्याचा आवाज बुलंद केला. “धर्मासाठी चादर” म्हणून ओळख मिळवलेल्या गुरुजींनी स्वतःचे प्राण अर्पण करूनही सामान्य जनतेच्या श्रद्धा आणि हक्कांचे संरक्षण केले.
११ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्ली येथे गुरु तेग बहादुर सिंग यांना अमानुषपणे शहीद करण्यात आले. त्यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून, सर्व मानवजातीच्या धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते. याच ऐतिहासिक बलिदानाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्रभर फिरणारा हा रथ खेडमध्ये दाखल झाला असून, नागरिक मोठ्या श्रद्धेने त्याचे दर्शन घेत आहेत.
या रथात गुरुजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांनी दिलेले संदेश, समाजासाठी केलेले कार्य आणि त्यागाची परंपरा दृश्य स्वरूपात सादर करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि श्रद्धाळू मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून गुरु तेग बहादुर सिंग यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहेत. त्यांच्या जीवनातून मिळणारा अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा संदेश आजच्या पिढीसाठीही तितकाच प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.












