रस्ताकडेला पडलेल्या ७० वर्षीय वृद्धाला सुखरूप पोहोचवले घरी
सावंतवाडी । प्रतिनिधी : येथील आरपीडी रोडवरील साई मंदिर परिसरात दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाला सावंतवाडी पोलिसांनी माणुसकी दाखवत सुखरूप त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक जाणिवेमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सावंतवाडी बाजारपेठेतील आरपीडी रोडवरील साई मंदिर परिसरात एक वयस्कर व्यक्ती गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला हतबल अवस्थेत बसून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. वाढलेले वय आणि अशक्तपणामुळे त्यांना नीट बोलता येत नव्हते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या आधार कार्डवरून त्यांचे नाव तुकाराम कृष्णा म्हापणकर (वय ७०) असल्याचे समजले.
पोलिसांची तातडीची कारवाई या घटनेची माहिती तत्काळ सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पावले उचलली. श्री. म्हापणकर हे घावनळे-खुटवळवाडी येथील रहिवासी असल्याची खात्री पटल्यानंतर, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश जाधव आणि भूषण भोवर यांनी त्यांना त्यांच्या मूळ गावी नेले.
नातेवाईकांच्या स्वाधीन पोलिसांनी घावनळे येथे जाऊन पोलीस पाटील तोरसकर यांच्या उपस्थितीत श्री. म्हापणकर यांना त्यांचा पुतण्या राजन म्हापणकर यांच्या स्वाधीन केले. आपला माणूस दोन दिवसांनी सुखरूप घरी परतल्याचे पाहून नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
पोलिस केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच राखत नाहीत, तर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारीही चोख पार पाडतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध
झाले आहे.












