सावंतवाडी: महिलांच्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी या वर्षीच्या नवरात्रोत्सवानिमित्त ‘शिवकन्या’ संस्थेने ‘फुगडी महोत्सव’ आणि फुगडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात सुरू होईल.
या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. विजेत्यांसाठी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम येणाऱ्या संघाला १०,००० रुपये, द्वितीय क्रमांकाला ७,००० रुपये, तर तृतीय क्रमांकाला ३,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.
स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी, उपस्थित प्रेक्षकांसाठी देखील आकर्षक भेटवस्तू आणि लकी ड्रॉची सोय करण्यात आली आहे.
या महोत्सवाचे यशस्वी आयोजन विद्या मादाकाचे, ऋतिका रांगणेकर, कृतिका कोरगावकर, ऋतुजा मोरे, श्रद्धा धारगळकर, कोमल म्हापणकर आणि मयुरी नेरुरकर या ‘शिवकन्या’ संस्थेच्या सदस्यांनी केले आहे. हा फुगडी महोत्सव महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा एक उत्तम प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.












