अडूर | वार्ताहर :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपर गावात आयोजित शिवजयंती उत्सवात यंदा शिवकालीन युद्धकलेच्या थरारक प्रात्यक्षिकांनी विशेष आकर्षण ठरवले. शौर्य, चपळता आणि शिस्त यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण गाव भारावून गेले.
सायंकाळी आयोजित युद्धकला सादरीकरणात धावडेश्वर आखाडा पथक, तुरळ यांनी आगीचे गोळे फिरवणे, बनाट्या व काठ्यांचे वेगवान फटके, पारंपरिक दांडपट्टा तसेच समन्वयपूर्ण युद्धचालींचे कौशल्यपूर्ण प्रदर्शन केले. प्रत्येक हालचालीत नेमकेपणा, वेग आणि संतुलन यांचे प्रभावी दर्शन घडले. प्रात्यक्षिकादरम्यान सुरक्षिततेची पूर्ण दक्षता घेण्यात आली होती.
या सादरीकरणातून शिवकालीन सैनिकी प्रशिक्षणातील शिस्त, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व आणि धैर्याची परंपरा जिवंत करण्यात आली. युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवपूजन करण्यात आले. पिंपर गावातील तसेच गुहागर तालुक्यात परिचित असलेले भजनकार श्री. दत्तात्रय रहाटे यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीतांनी कार्यक्रमाला भावपूर्ण रंग चढवला. वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. मिथिलेश राणे यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.
कोल्हापूर येथील शिव-शंभू व्याख्याते कुमार मारुती खिरुगडे यांनी आपल्या ओजस्वी व्याख्यानातून शिवकालीन इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग जिवंत केले. त्यांच्या विचारांना विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सायंकाळी ४ वाजता मारुती मंदिर ते गणपती मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेले गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. सूत्रसंचालन श्री. संजय विचारे यांनी प्रभावी शब्दांत केले. त्यांच्या प्रास्ताविकाने वातावरणात शिवभक्तीची भावना जागृत झाली.
उत्साह, भक्तिभाव आणि इतिहासाची जाण यांचा संगम साधणारा पिंपरमधील शिवजयंती उत्सव युवकांना प्रेरणा देणारा ठरला. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.













