रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहराजवळील उत्कर्षनगर-कुवारबाव येथील घरफोडीतील एका महिलेसह तीन संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी या घरफोडीत 33 हजाराचा मुद्देमाल लांबवला होता. शुक्रवारी न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.घर फोडीची ही घटना 15 ते 16 ज्ाुलै 2023 रोजी दुपारी 2 वा.सुमारास घडली होती.
जुनेद जाफर मस्तान, रेहान बाबामिया मस्तान, वसीम नजीर सोलकर, फईमिदा इब्राहिम दर्वेश अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. यातील फिर्यादी या कुवारबाव -उत्कर्षनगर येथील प्रतिभा भिमराव पाटील यांच्या घरात भाड्याने रहात होता. त्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी कापून संशयित चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातील 5 हजाराचा टिव्ही, 20 हजाराचे एक सोन्याचे मंगळसूत्र, 5 हजाराची 2 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 2 ग्रॅम वजनाची 2 हजाराची अंगठी, एक प्लास्टीकचा डबा त्यामध्ये एक हजार रुपयांची चिल्लर असा 33 हजाराचा मुद्देमाल पळविला होता. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात शहर पोलिसांनी तीन संशयितांसह एका महिलेला अटक केली. शुक्रवारी 28 जुलै रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.











