सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्वामी दर्शन करीता मंदीर बंद राहील.
मसुरे | झुंजार पेडणेकर
फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमा मंगळवार दि. ३ मार्च रोजी खग्रास (ग्रस्तोदीत) चंद्रग्रहण आल्यामुळे अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात पुरोहित मंदार महाराज पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या नित्यक्रमात व स्वामींच्या दिनक्रमात बदल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
अक्कलकोट शहर व परिसरात या खग्रास ग्रस्तोदीत चंद्रग्रहणाचे स्पर्श सुर्यास्ताच्यावेळी सायं ६ वाजून ३१ मिनीटानी तर मोक्ष सायंकाळी ६ वाजून ४८ मिनीटाला होईल. एकूण १८ मिनीटे खग्रास ग्रस्तोदीत चंद्र ग्रहणाचा मुख्य पर्वकाळ राहील.
मंगळवार ३ मार्च रोजी खग्रास ग्रस्तोदीत चंद्रग्रहणाचे वेध सुर्योदयापासून प्रारंभ होत असल्याने सुर्योदयापासून ग्रहणाचे वेध पाळावेत. वेध व ग्रहण काळात भोजन व कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण वगैरे करू नये. या काळात जप, तप, श्राद्ध इत्यादी कर्म करता येतात. अबालवृध्द, विकलांग, आजारी आणि गर्भवती स्त्रीयांनी सकाळी ११ पासून मोक्षापर्यत ग्रहणाचे वेध पाळावेत.
मंगळवार दि. ३ मार्च रोजी खग्रास (ग्रस्तोदीत) चंद्रग्रहण रोजी सुर्योदयापासून ग्रहणाचे वेध असल्याने मंदीरात स्वामी भक्तांच्या वतीने सकाळी नित्यनियमाने होणारे अभिषेक व सकाळी ११:३० ची महाराजांची नैवेद्य आरती होणार नाही, परंतू ग्रहण पर्व काळात दिवसभर ते सायंकाळी ६ पर्यंत स्वामी दर्शन चालू राहील. खग्रास ग्रहणाचे स्पर्श सायं ६ वाजून ३१ मिनीटानी तर मोक्ष सायंकाळी ६ वाजून ४८ मिनीटाला असल्याने सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत २ तास मंदीर बंद राहील. यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे दर्शनाकरीता मंदीर उघडण्यात येईल. यानंतर मंदीरात रात्री ७:४५ ते ८:४० यावेळेत नित्यनियमाने होणारी महाराजांची शेजारतीही होणार नाही. दिनांक ४ मार्च रोजी पहाटेची काकडा आरती व भाविकांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक या धार्मिक विधींना नेहमीप्रमाणे सुरूवात होईल यांची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.












