रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करणारा सावंतवाडीचा ‘आरोग्यदूत’ म्हणजे डॉ. वजराटकर

सेवानिवृत्तीनंतरही सेवेचा लाभ मिळावा : ॲड. अनिल निरवडेकर

डॉ. पांडुरंग वजराटकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार : मान्यवरांची उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात २०१८ पासून ते आजमितीपर्यंत केवळ रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून सेवा देणारे पण डॉ. पांडुरंग वजराटकर यांच्या सारख्या सावंतवाडीच्या खऱ्या आरोग्य दूताच्या सेवेला आजपासून आपण मुकणार आहोत. मात्र ते सेवानिवृत्त होत असले तरीही त्यांनी पुढील जीवनात रुग्ण सेवेचे हे व्रत असेच कायम जोपासावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले.
दरम्यान, शासकीय नियमानुसार ते निवृत्त होत असले तरीही त्यांच्या अनुभवाचा लाभ पुढील किमान दोन वर्षे सावंतवाडीलाच मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग वजराटकर यांच्या सेवा निवृत्तीपर निरोप समारंभ सोहळ्यात ॲड. निरवडे कर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी विविध मान्यवरांनी डॉ. वजराटकर यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.
या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सौ. मोहिनी वजराटकर, डॉ. अनिकेत वजराटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तरकर, निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, प्रफुल्ल वालावलकर, राजू मसुरकर, भास्कर केरवडेकर, डॉ. अमोल पावसकर, डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. गिरीश कुमार चौगुले, डॉ. अभिजित चितारी, डॉ. संदीप सावंत, डॉ. सागर जाधव, तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सोन्सुरकर यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. अमोल पावसकर यांनी त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सांगत, डॉ. वजराटकर यांचा ज्ञानेश्वरीवरील अभ्यास आणि रुग्णांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.निवृत्तीनंतर त्यांनी कुटुंबाला वेळ द्यावा आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखमय जावे, अशी शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले की, रुग्णांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. वजराटकर यांनीही रुग्णसेवेचा आदर्श निर्माण केला असून डॉक्टरांनी संवादकौशल्य कसे असावे, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.

यावेळी सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियनची आवश्यकता असल्याचे सांगत, डॉ. वजराटकर यांनी निवृत्तीनंतरही आधुनिक उपचारपद्धती स्वीकारून सेवा सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी डॉ. वजराटकर यांच्या सेवेचा गौरव केला. त्यांच्यासारख्या सहकाऱ्यांमुळेच आपण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासारख्या मोठ्या रुग्णसंख्येच्या रुग्णालयात रुग्णांना योग्य ती सेवा देऊ शकत आहोत. त्यांची कमी निश्चितच भासेल मात्र यापुढेही आपण सर्वांनी रुग्णसेवेचे हे व्रत असेच कायम राखुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आयुष्यात देव नाही पण देवासारखी अनेक माणसं भेटली : डॉ. वजराटकर

सेवानिवृत्तीच्या माझ्या या कार्यक्रमात माझ्यावर अनेक स्तुती सुमने उधळली गेली. मात्र, त्यातील केवळ काही टक्केच गुण आणि माझे समजतो मात्र मला माझ्या या संपूर्ण प्रवासात भेटलेले माझे सर्व सहकारी, मित्र व माझे कुटुंबीय यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आयुष्यात देव प्रत्यक्ष भेटला नाही मात्र देवासारखी अनेक माणसे भेटली. तुमची ही साथ यापुढेही अशीच लाभो असे भावोद्गार डॉ. पांडुरंग वजराटकर यांनी काढले. सेवानिवृत्तीपर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपला संपूर्ण जीवनप्रवास उलगडला. या जीवन प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे सहकारी मित्र तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.