खेड रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रीय कर्मचारी सेना रिक्षा संघटनेच्या अधिकृत लोगोचे भव्य अनावरण

खेड (प्रतिनिधी) : खेड रेल्वे स्टेशन परिसरात १ मार्च २०२६ रोजी शिवसेना पक्ष प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना रिक्षा संघटनेच्या अधिकृत लोगोचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संघटनेची ओळख आणि एकता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला रिक्षाचालक व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम, तालुकाध्यक्ष सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, खेडचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, युवा सेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन आणि संघटनेचे आधारस्तंभ बुवा शिंदे उपस्थित होते.

सीएनजी (CNG) समस्येवर सकारात्मक पाऊल लोगो अनावरणासोबतच रिक्षाचालकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील कामाक्षी पेट्रोल पंप येथे निर्धारित वेळेनंतर सीएनजी गॅस उपलब्ध होत नसल्याने रिक्षाचालकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात संघटनेने तहसीलदारांकडे पाठपुरावा केला होता. तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झालेले अधिकृत पत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. यामुळे सीएनजीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

एकजूट आणि हक्कांचा लढा कार्यक्रमाचे नियोजन सचिव विलास देवळेकर, उपसचिव सुशांत पाटील आणि संपर्कप्रमुख सचिन उर्फ बंड्या रजपूत यांनी केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की, रिक्षाचालकांच्या दैनंदिन अडचणी, न्याय्य मागण्या आणि उपजीविकेच्या प्रश्नांसाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील. या कार्यक्रमाला राष्ट्रीय रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.