खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावची ग्रामदैवत असलेल्या कोटेश्वरी मानाई देवी मंदिरात यंदाचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. पारंपरिक पद्धतीने सहानेवरील पालखीमध्ये विराजमान झालेल्या देवीची गावकऱ्यांनी खणा-नारळाने ओटी भरून विधीवत पूजा केली. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
यावेळी गावचे सुपुत्र आणि रामदास कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, तरुण उद्योजक अनिकेत कदम तसेच उद्योजक शैलेशशेठ कदम आदी कदम कुटुंबीय व परिवार उपस्थित होते. कदम कुटुंबीयांनी पालखीसमोर मनोभावे पूजा करून ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतले.
मंदिर परिसरात ढोल-ताशांचा गजर, खालूबाजा तसेच सनई-चौघड्यांच्या निनादाने वातावरण भारावून गेले होते. पारंपरिक वेशभूषेत सजलेले ग्रामस्थ, भक्तिगीतांचा गजर आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे जामगे गावात भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिमगोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला.
शिमगोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक एकोपा, परंपरेचे जतन आणि ग्रामदैवताप्रती असलेली श्रद्धा यांचा संदेश देण्यात आला. ग्रामदैवताच्या कृपेने गावात सुख-समृद्धी, शांतता आणि ऐक्य नांदो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.













