जागतिक महिला दिन विशेष
संतोष कोत्रे | लांजा-: असे म्हणतात की एक महिला शिकली की, संपूर्ण कुटुंब साक्षर होते. सध्याची परिस्थिती पाहिली तर आज सर्वच क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली आहेत. मग ते राजकारण असो, उद्योग व्यवसाय असो किंवा आयटी तंत्रज्ञान. या सर्वच क्षेत्रात महिलांनी आपली उपयुक्तता आणि कर्तृत्व सिद्ध केले आहे. अशांपैकीच एक म्हणजे लांजा शहरातील छाया मंदार गांगण होय.
अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूल च्या माध्यमातून वेगळी वाट चोखाळत महिला, तरुणींना मोटर ट्रेनिंग चे धडे देत आहेत. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे, हटके करण्याच्या त्यांच्या या जिद्दीमुळे अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूल ने लांजा शहरासह तालुक्यातील महिलांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यामुळेच आज शेकडो महिला चारचाकी वाहन चालवून स्वावलंबी बनल्या आहेत.
मोटार ट्रेनिंग सारख्या चॅलेंजिंग आणि हटके व्यवसायात पाऊल ठेवणाऱ्या छाया गांगण यांच्याशी या संदर्भात संवाद साधला असता एक गृहिणी ते अथर्व मोटर ट्रेनिंग स्कूलच्या संचालिका या दरम्यानचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. त्या म्हणाल्या की, ‘ गाडी शिकणे फक्त कला नाही, ती आत्मनिर्भरतेची दिशा आहे’ हे स्लोगन घेऊन आम्ही या व्यवसायात उतरले आहे. बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या छाया गांगण यांना सुरुवातीपासूनच
गाडी चालवण्याची खूप इच्छा होती परंतु त्यावेळची एकूणच परिस्थिती आणि गाडी शिकवणार कोण? स्वतःची गाडी नसल्याने हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे गाडी शिकणे हा मनातील इच्छा त्यावेळी मनातच राहून गेली होती .
कालांतराने छाया गांगण यांचे मंदार गांगण यांचेशी लग्न झाले. मंदार गांगण हे अगोदर पासूनच वेरवली येथील तु.पु.शेट्ये विद्यालय या ठिकाणी ट्रेनिंग प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनीच छाया गांगण यांना लग्नानंतर गाडी चालवण्यास शिकवले. मंदार गांगण यांचीही आपलं स्वतःचे असे एक ट्रेनिंग स्कूल असावं अशी इच्छा होती . परंतु यांचे स्वतःचे गॅरेज असल्याने या ट्रेनिंग स्कूल साठी संपूर्ण वेळ देणे त्यांना शक्य नव्हतं. याबाबत बोलताना छाया गांगण यांनी सांगितले की, मला गाडी शिकवत असतानाच पती मंदार यांनी आपल्याला भविष्यात ट्रेनिंग स्कूल चालू करायचे आहे, हे सांगितले होते. याचवेळी
कशा पद्धतीने ट्रेनिंग दिले पाहिजे, यांचे देखील धडे त्यांनी मला दिले होते.
आजच्या युगात ज्या पद्धतीने स्त्रिया वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात काम करत आहेत तशाच पद्धतीने आपल्या पत्नीने देखील सगळ्यांपेक्षा वेगळ्या व्यवसायात उतरले पाहिजे असे त्यांचे मत होते. आपली देखील खुप दिवसांपासूनची इच्छा होती. एक वेगळेपण या व्यवसायात आहे. म्हणूनच मी मोटर ट्रेनिंग स्कूल या व्यवसायाकडे वळल्याचे छाया गांगण यांनी सांगितले. या व्यवसायात उतरल्यानंतर आजवर अनेक वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळाल्याचे त्या म्हणाल्या.
छाया गांगण यांना या संपूर्ण व्यवसायात पती मंदार यांची खंबीर साथ लाभली असून दोन्ही मुले देखील त्यांना मदत करतात. वेळोवेळी पती सुद्धा लागणारे मार्गदर्शन करतात. याबरोबरच घरातील त्यांची आई, सासू-सासरे या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद यामुळेच मी आज यशस्वीरीत्या प्रशिक्षण देऊन महिलांना सक्षम करण्याचे काम करत आहे. आज आपल्या मोटार ट्रेनिंग मधून शिकून बाहेर पडलेल्या महिला यामध्ये पार्लर वाल्या महिला गाडी शिकून आपल्या पार्लर व्यवसायासाठी तालुक्या बाहेरील ऑर्डर साठी स्वतःची गाडी घेऊन जात आहेत. माझ्यासाठी ही बाब समाधान देणारी आहे. महिलांना वाहन चालविणे शिकवून आत्मनिर्भर बनवून त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम करण्याचे जे काम मी करत आहे त्याचे मला आज खूप समाधान आहे, असे छाया गांगण यांनी सांगितले.
आजवरच्या या ट्रेनिंग स्कूलच्या प्रशिक्षणा दरम्यान छाया गांगण यांना अनेक अनुभव मिळाले.
छाया गांगण यांनी सांगितले की सर्व वयोगटातील (१८ते ६०) मधील स्त्री-पुरुषांना गाडी चालवण्याची अत्यंत आवड असते. मात्र प्रत्येकाने गाडी चालविण्यासाठी आपल्या सोयीप्रमाणे काही चित्र मनात रंगवलेली असतात. अशावेळी त्यांच्या मनातील भीती, गैरसमज दूर करून गाडी चालवण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हे प्रशिक्षकांचे खरे कौशल्य आहे. त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणातील एक महिन्याच्या सहवासात मलाही त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकता येतात.
अनेक गरजू महिला स्वतःच्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी गाडी शिकायला येतात आणि त्या जेव्हा स्वतः गाडी चालवतात आणि खूप खुश असतात. त्यांना स्वावलंबी बनण्याचे समाधान लाभते काहीजणी सांगतात छायाताई, तुम्हाला आज मी माझ्या गाडीमधून लॉंग ड्राईव्ह ला घेऊन जाते. आणि त्यांच्या मैत्रिणींना आत्मविश्वासाने सांगतात की अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूल मध्ये जा. तिथे आत्मविश्वास वाढून चांगली सुरक्षित गाडी चालवण्यासाठी तयार केले जाते. हाच आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण करण्याचे काम आपण करत आहोत.
अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून छाया गांगण यांनी आजवर ४३५ महिलांना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले असून १३० पुरुषांना देखील गाडी चालवायचे प्रशिक्षण दिले आहे. भविष्यात मला माझ्या भगिनींसाठी आर्थिक सहकार्य लाभेल, असे छोटे मोठे व्यवसाय सुरू करून त्यांच्या हातांना काम घेऊन त्यांनाही आर्थिक सक्षम बनवण्याची आपली इच्छा असल्याचा मानस छाया गांगण यांनी व्यक्त केला आहे.
अशाप्रकारे गाडी चालवणे आणि शिकवणे एक चॅलेंजिंग काम आहे. हे आव्हान छाया गांगण यांनी यशस्वीरित्या स्वीकारताना महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेण्याचे, त्यांच्यात स्वावलंबनाची भावना निर्माण करण्याचे काम करत आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा












