देवरूख: खडतर प्रशिक्षण पूर्ण करून प्रा. सानिका भालेकर बनल्या लेफ्टनंट !

जागतिक महिला दिन विशेष

निलेश जाधव / देवरूख

८ मार्च जागतिक महिला दिन. सर्वत्र नारी शक्तीचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. महिलांचा सन्मान व आदर केवळ याच दिवसापुरता मर्यादित न राहता, तो कायम होत राहावा यासाठी जो समाज दक्ष असतो, त्या समाजाची सर्वांगीण प्रगती व विकास होत असतो. समाजामध्ये काही कर्तुत्वान महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. स्त्रियांच्या चाकोरी बाहेरील कार्याची दखल समाज कायमस्वरूपी अभिमानाने घेत असतो. अशाच एका कर्तृत्ववान व उपयुक्त कार्य करणाऱ्या महिलेच्या कार्याची दखल आज आपण घेणार आहोत. ती महिला केवळ शिक्षिकाच नाही तर, भारत मातेच्या सेवेसाठी तयार होणाऱ्या भावी महिला व पुरुष सैनिकांना देशप्रेमाचं बाळकडू पाजून या नौजवानांमध्ये आत्मभान जागृत करत आहे. या कर्तुत्वान महिला अधिकारी आहेत संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील लेफ्टनंट प्रा. सौ. सानिका समीर भालेकर (पूर्वा शिवमीच्या अपर्णा अनंत भुवड). प्रा. सानिका भालेकर यांची कामगिरी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

लेफ्टनंट प्रा. सौ. सानिका समीर भालेकर या देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत. याच महाविद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी असून, ५८ महाराष्ट्र बीएन एन. सी. सी., ओरोस अंतर्गत येणाऱ्या आर्मी एनसीसी युनिटचा कार्यभाग गेली सहा ते सात वर्ष सांभाळत आहेत. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी जुलै २०२५ ते सप्टेंबर २०२५ कालावधीत ए. एन. ओ. वुमन्स ट्रेनिंग सेंटर, ग्वालियर, मध्यप्रदेश येथे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून लेफ्टनंट हे भूषणावह पद प्राप्त केले आहे. महाविद्यालयाच्या एनसीसी- आर्मी युनिटच्या प्रारंभापासून त्यांनी युनिट केअर टेकर म्हणून आपल्या या कार्याला सुरुवात केली आहे. लेफ्टनंट प्रा. भालेकर यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरमधून एम. ए. अर्थशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, त्या प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असणारी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या त्यांचे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर येथे “रत्नागिरी जिल्ह्यातील जंगली फळांचा आर्थिक अभ्यास” या विषयावर पीएचडीचे संशोधन सुरू आहे. महाविद्यालयात त्यांनी दैनंदिन अध्यापनाबरोबर क्रीडा, सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा योजना आणि महिला विकास कक्ष या विभागात विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कार्य करून महाविद्यालयाला नावलौकिक प्राप्त करून दिला आहे.

ए. एन. ओ. वुमन्स ट्रेनिंग सेंटर, ग्वालियर (मध्यप्रदेश) येथे लेफ्टनंट भालेकर यांच्यासह भारतातील १३५ महिला प्राध्यापिकांनी या ठिकाणी खडतर प्रशिक्षण घेतले. वयाच्या ४८व्या जिद्दीने यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून समाजासाठी आदर्श घडवला आहे. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातून ६ महिला प्राध्यापिका सहभागी झाल्या होत्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या त्या केवळ एकमेव महिला होत्या. या खडतर प्रशिक्षणामध्ये दैनंदिन पूर्णवेळ परेड, रायफल चालवण्याचे प्रशिक्षण, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे प्रशिक्षण, आपत्कालीन परिस्थिती व रेस्क्यू ऑपरेशन या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाचा समावेश होता. हे संपूर्ण प्रशिक्षण ग्वालियरमधील पूर्वीच्या सिंदिया राजवाड्यामध्ये, ज्याचे ब्रिटिशांनी छावणीमध्ये रूपांतर केले होते, अशा पुनीत वास्तुत झाल्याचे लेफ्टनंट प्रा. भालेकर यांनी अभिमानाने नमूद केले. या प्रशिक्षणा दरम्यान संरक्षण क्षेत्रातील विविध अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याकडून अभ्यासपूर्ण प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली, त्यांनी केलेले मार्गदर्शन कायमस्वरूपी लक्षात राहणारे होते. विविध युद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या अधिकाऱ्यांकडून युद्धाच्या प्रसंगातील अनुभव विशेषत: कारगिल युद्धातील अनुभव ऐकून जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देऊन गेला. त्याचवेळी देशसेवा व देश प्रेमापोटी या क्षेत्रात घेतलेल्या प्रवेशाचा निर्णय योग्य असल्याचे मनोमन पटले, असेही प्रा. भालेकर यांनी आवर्जून सांगितले.

पालक व विद्यार्थ्यांकडून एनसीसीसाठी मिळणारा सकारात्मक पाठिंबा बळ देणारा आहे. एनसीसीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकाधिक प्रमाणामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये आपलं करियर घडवावं यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांमध्ये असणारी स्वयंशिस्त, जिद्द व आत्मविश्वास याद्वारे विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत आहेत. अलीकडेच आमचे कॅडेट साहिल शिवगण व राज घोसाळकर हे दिल्लीतील नॅशनल कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. २३ जानेवारी, २०२६ रोजी सुभाष दिवसाच्या निमित्ताने विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात एनसीसी पथकासाठी आयोजित केलेल्या परेड स्पर्धेत महाविद्यालयाने यशस्वी कामगिरी केली. अनेक विद्यार्थी ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षेत उत्तम श्रेणीत उत्तीर्ण होतात, यामुळे त्यांना संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी प्राप्त होतात. आपल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी विविध संरक्षण क्षेत्रामध्ये भारत भूमीची सेवा करावी, यासारखी अभिमानाची दुसरी कोणती बाब नसल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले. सुरुवातीला केअरटेकर म्हणून मोठी जबाबदारी नव्हती, परंतु लेफ्टनंट झाल्यानंतर कॅडेट्सचे विविध कॅम्प व ट्रेनिंगमधील सहभाग, महाविद्यालयातील नियमित ट्रेनिंग व आर्मी युनिटद्वारे होणारे प्रशिक्षण, तसेच स्थानिक सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे लागते. यामुळे कमालीचा आनंद व सुख मिळते. पुन्हा एकदा ६ वर्षानंतर मला प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण संधी प्राप्त होणार आहे, यातून नवनवीन अनेक गोष्टी शिकता येणार आहेत व स्वतःलाही अपडेट ठेवता येणार आहे. मला स्वतःला एनसीसीमुळे बरेच काही मिळवता आले आहे. सैन्य दलातील निष्ठावान अधिकारी व जवानांना जवळून पाहता येते, आत्मविश्वास, कणखरता, उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य प्राप्ती, समाजभान, कर्तव्यनिष्ठा व जबाबदारी मला प्राप्त झाली आहे. आता ही तर सुरुवात आहे, अजून बरेच काही करणे बाकी आहे, असा सकारात्मक आशावाद प्रा. सानिका भालेकर यांनी दै. ‘प्रहार’शी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या देशरूपी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..