पुण्यातील अस्करवाडीत इफ्तारदरम्यान १४ जणांवर हल्ला; १५० जणांच्या टोळीचा कहर, अद्याप अटक नाही

सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट, संशयित फरार
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू, कठोर कारवाईचे आश्वासन

पुण्यातील बोपदेव घाटाजवळील अस्करवाडी येथे १३ मार्च रोजी इफ्तारदरम्यान १४ जणांवर भीषण हल्ला करण्यात आला. सुमारे १५० जणांच्या टोळीने काठ्या, दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांची ओळख पटवली असली तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. आरोपी आपल्या घरातून फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.


पुणे : बोपदेव घाटाजवळील अस्करवाडी येथे १३ मार्च रोजी रमजान इफ्तारसाठी जमलेल्या कोंढवा परिसरातील १४ जणांवर सुमारे १५० जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन संशयितांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांच्या अस्करवाडी आणि आसपासच्या गावांतील घरांना भेट दिली, मात्र ते फरार झाल्याचे आढळले. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

१३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पीडित इफ्तारसाठी तलावाजवळ जमले होते. त्यांनी जेवणाची पाकिटे उघडताच अचानक १५० जणांची टोळी घटनास्थळी दाखल झाली. या टोळीने काठ्या, धारदार शस्त्रे, चाबूक आणि दगडांचा वापर करत बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत हल्ला केल्याचे फिर्यादी फिरोज सय्यद (३६) यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

कदम यांनी पुढे सांगितले की, अस्करवाडी व परिसरातील हॉटेल्स आणि आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नाही. उपलब्ध फुटेजमध्ये काही दुचाकींवर लाठ्या-काठ्या घेऊन आलेले व्यक्ती दिसत आहेत, मात्र ओळख पटवणे कठीण जात आहे.

दरम्यान, फिरोज सय्यद यांनी सांगितले की, त्यांनी सोमवारी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची भेट घेतली. यावेळी हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.