कुंभार्ली घाट सुस्थितीत राहिलाच पाहिजे!

मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्यांना ठणकावले

चिपळूण (प्रतिनिधी):काय करायचे ते करा पण घाट हा सुस्थितीत राहिलाच पाहिजे… पडलेले खड्डे आणि कोसळलेल्या भिंती अपघातास कारणीभूत ठरू शकतात.;आम्ही बॅरल लावल्या नंतर तुम्ही उपाययोजना केल्यात मग एवढे दिवस त्याकडे का दुर्लक्ष केले? याचे उत्तर आज देता येत नसले तरी येत्या आठ दिवसात तुम्हाला द्यावेच लागेल, असा इशारा मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयावर मनसेने धडक मारली. मात्र, अधिकारीच बैठकीला मुबईमध्ये असल्याने मनसैनिकांनी पुन्हा धडक मारण्याचा इशारा दिला आहे.

कुंभार्ली घाटातील रस्तावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ताच तुटला आहे. या घाटावर करोडो रुपयांचा निधी दरवर्षी खर्च होत आहे, अशावेळी या घाटाच्या समस्या मात्र काही संपल्या संपत नाहीत.

यामुळेच मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी आक्रमक भूमिका घेत मनसैनिकासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभाग कार्यालयावर धडक मारली.

मनसेचे राजू खेतले यांच्या नेतृत्वाखाली तालुका संघटक मिलिंद कदम, रिक्षा संघटक राजेंद्र उंडरे, विभाग अध्यक्ष सुरेश घाग, उपविभाग अध्यक्ष विकास महादम, प्रशांत हटकर,शाखा अध्यक्ष आबा हटकर, निरंजय निर्मळ, संजय वाजे, भाई सुर्वे, मंगेश महाडिक, प्रकाश राक्षे,आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हे आजारी असल्याने सुट्टीवर आहेत. तर कार्यकारी अभियंता हे मुबई येथे बैठकीसाठी असल्याने उपस्थित शाखा अभियंता यांच्याजवळ चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी अधिकारीच नसतील तर मला उत्तरे कोण देणार? असा सवाल केला. मात्र, जी माहिती असेल ती देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे शाखा अभियंता यांनी स्पष्ट केले.

चिपळूण कराड मार्गावर पडलेलं खड्डे आणि या पूर्वी त्यावर झालेला खर्च याची माहिती मिळाली पाहिजे. घाटावर एवढा खर्च होत असताना एप्रिलमध्ये तुटलेल्या रस्त्या ठिकाणी संरक्षणभिंती अथवा अन्य उपाय योजना का केली नाही ? हा महत्वाचा असणारा मार्ग मात्र त्या कडे दुर्लक्ष का असा सवाल केला. त्याच बरोबर अन्य ठिकाणी रस्ताची अवस्था बघा असा सवाल करीत आम्ही इथे ठेके मागायला आलो नाही आणि येणार ही नाही. मात्र, जर खड्डे आणि तुटलेले रस्ते यामुळे अपघात झाले तर त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असेल असा इशारा दिला.

संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांना कार्यकारी अभियंता यांच्या जवळ संपर्क करून दिला. यावेळी राजू खेतले यांनी तुम्ही मुंबईवरून आल्यानंतर आम्ही पुन्हा येतो असे स्पष्ट केले.

दरम्यान संबंधित अधिकारी नसल्याने मनसेच्या वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी सार्वजनिक कार्यालयावर पुन्हा धडक मारण्याचा इशारा दिला असून लवकरच मोठ्या संख्येने येऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल असे स्पष्ट केले. जे काय जनतेचे विषय असतील ते मनसैनिकासमोरच केले जातील असे सांगितले.