चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने पालकमंत्र्यांकडे मागणी !
आमदार शेखर निकम यांचा या कामी पुढाकार !
*चिपळूण (प्रतिनिधी):* 87 वर्षापूर्वी चिपळूण नजीकच्या खेर्डी (तालुका चिपळूण) येथील हत्तीच्या माळावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोतीविरोधी परिषद घेऊन कोकणातील शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली होती. त्या ऐतिहासिक परिषदेमुळे खोती पद्धती नष्ट होऊन बहुजन समाजाला जमिनीचे मालक बनता आले. त्यामुळे अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुउद्देशीय स्मारक उभे करण्यात यावे, ज्याचा उपयोग कोकण विकासासाठी होऊ शकेल, अशी मागणी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने मुंबई मुख्य समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत व चिपळूणचे आमदार शेखर निकम यांची मुंबईत भेट घेऊन आज केली आहे.
स्वातंत्र्यपूर्व भारतात जमीनदारीच्या विविध पद्धती होत्या. त्यापैकी कोकणात खोती पद्धती होती. या खोती पद्धतीमुळे कोकणातील बहुजन समाजाची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती. सगळ्या जमिनी खोतांच्या मालकीच्या असत. मात्र खोतांच्या जमिनीमध्ये पिके पिकवण्याचे काम तळागाळातील वर्ग, बहुजन समाज करीत असे. त्यांना कुळे म्हटले जात होते. या कुळांची खोतांकडून मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली जात होती. कोकणातील बहुजन समाजातील शेतकऱ्यांच्या या दुःखाला वाचा फोडण्याचे काम त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. 1927 सालापासून खोती प्रश्नावर त्यांनी आपले लढे उभारले होते. त्यासाठी मुंबई विधिमंडळामध्ये बाबासाहेबांनी कायदेशीर लढा पुकारलाच, परंतु रस्त्यावरील लढाई देखील त्यांनी सुरू ठेवली. त्याकरिता कोकणातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे लढे उभारतानाच खोती विरोधी परिषदा घेतल्या गेल्या. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात या प्रश्नासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीन वेळा दाखल झाले. सन (१९२९/१९३०) शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या. खोती विरोधी परिषदा घेऊन जाणीव जागृती निर्माण केली. दिनांक 16 मे 1938 रोजी सर्वात मोठी खोती विरोधी परिषद खेरडी येथील हत्तीमाळावर घेतली. हा परिसर सध्या खेर्डी एमआयडीसीमध्ये येतो. त्या परिषदेमध्ये अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण ठराव देखील करण्यात आले होते. दलित , अस्पृश्य समाजासोबतच इतर मागासवर्गीय बहुजन समाजातील वर्गही मोठ्या संख्येने त्यावेळी उपस्थित होता. त्यामुळे हा प्रश्न बाबासाहेबांनी पुढे धसास लावून कोकणातील कुळांच्या नावाने जमिनी होण्यात बाबासाहेबांची मोठी भूमिका राहिलेली आहे. त्यासाठी खेर्डी येथील खोती विरोधी परिषद कारणीभूत ठरलेली आहे. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी कोकणासाठी फार महत्त्वाची आहे.
याकरिता चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण/ मुंबई या संस्थेच्या वतीने सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा करून हत्ती माळावर भव्य असे स्मारक भवन उभारण्यात यावे अशी मागणी केली जात आहे . संस्थेच्या मुंबई मुख्य समितीच्या वतीने आज मुंबईत चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांची आमदार निवासात भेट घेऊन सदर प्रश्नावर सर्वंकष चर्चा करण्यात आली. तदनंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये हत्तीमाळाचे महत्त्व, खोती विरोधी परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चिपळूण शहराला तीन वेळा झालेली भेट अशा अनेक बाबी या चर्चेत मांडल्या गेल्या. आणि त्या ठिकाणी भव्य असे बहुउद्देशीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक भवन उभारण्यात यावे, त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यासह अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासाचे प्रकल्प राबविण्यात यावे, अशा प्रकारची मागणी ही या निमित्ताने करण्यात आलेली आहे.
पालकमंत्री उदय सामंत व आमदार शेखर निकम यांची भेट घेण्यासाठी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे शिष्टमंडळ अध्यक्ष विठोबादादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली भेटले. या शिष्टमंडळात संस्थेचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष उदय कदम, खजिनदार राहुल पवार, सल्लागार श्रीधर कदम, आर.बी गमरे, चिपळूण विभागाचे सरचिटणीस मंगेश जाधव, राजहंस पतसंस्थेचे संचालक अनिरुद्ध जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.












