विजयदुर्ग ग्राम विकास मंडळाच्या वतीने महा रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

विजयदुर्ग( प्रतिनिधी) : विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ, विजयदुर्ग पोलिस ठाणे आणि रामेश्वर, गिर्ये, विजयदुर्ग पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आयोजित महा रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराला विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, विजयदुर्ग ग्रामपंचायत प्रभारी सरपंच रियाज काझी, मंडळाचे मुंबई अध्यक्ष नितिन जावकर, गाव अध्यक्ष चंदकांत बिडये, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, गाव सचिव योगिता परुळेकर, मुंबई सचिव शैलेश खडपे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले. यामध्ये महिला -पुरुष रक्तदात्यां बरोबरच विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे अधिकारीवर्ग, विजयदुर्ग एस.टी. आगार कर्मचारी तसेच रामेश्वर, गिर्ये, विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करुन समाजोपयोगी कार्य संपन्न केले. सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे मंडळाच्या वतीने प्रशस्तीपत्र, गुलाबफुल, नवीन वर्ष कॅलेंडर आणि विशेष उपयोगी भेटवस्तू, तसेच रक्तदात्त्यांना महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद (SBTC) संस्थेचे रक्तपेढी जिल्हा रुग्णालय-सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद(SBTC) संस्थेचे रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्र जिल्हा रुग्णालय-सिंधुदुर्ग वतीने विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आरोग्य विभागात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिबिराला डॉ. सुनिल आठवले, मेडिकल फाऊंडेशन देवगड, डोळ्यांचे डॉ. श्री दशरथ हाके, विजयदुर्ग पोलिस ठाणे, रामेश्वर, गिर्ये व विजयदुर्ग ग्रामपंचायतीने सहकार्य केले.