नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत वाचन चळवळ अधिक गतिमान करा

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांचे आवाहन : शतायु ग्रंथालयांचा गौरव

​कुडाळ । प्रतिनिधी :
बदलत्या काळानुसार आणि नव्या तंत्रज्ञानानुसार वाचकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत. या बदलत्या प्रवाहात ग्रंथालयांनीही स्वत:ला अपडेट करणे ही काळाची गरज आहे. ग्रंथपाल हा ग्रंथालय आणि वाचक यांच्यातील मुख्य दुवा असून, वाचकांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्यासाठी आता नव्या बदलांची नांदी स्वीकारण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी येथे केले.

​उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५’ चा समारोप उत्साहात झाला. यावेळी जिल्ह्यातील शतक व दीड शतक पूर्ण केलेल्या १० ऐतिहासिक ‘शतायु’ ग्रंथालयांचा विशेष गौरव करण्यात आला.

​पुढील वर्षी सुवर्णमहोत्सवी ग्रंथालयांचा सन्मान
​जिल्ह्यात शतकोत्तर काळापासून ग्रंथालय चळवळ कार्यरत असणे हे भूषणावह असल्याचे सांगत सचिन हजारे म्हणाले की, “यावर्षी आम्ही १० शतायु ग्रंथालयांचा सन्मान केला आहे. पुढील वर्षी निश्चितपणे ५० वर्षे पूर्ण केलेल्या सुवर्णमहोत्सवी ग्रंथालयांचाही गौरव केला जाईल.”

​शतायु ग्रंथालयांचा गौरव
​यावेळी कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी विद्यालय वाचनालय, सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर, नगर वाचनालय शिरोडा, रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय, होडावडे येथील श्रीराम वाचनालय, बांदा येथील नट वाचनालय, मालवण नगर वाचनालय, आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, मालवण भरड येथील शिवाजी वाचन मंदिर, वाडे (देवगड) येथील सौ. मालती जनार्दन जोशी मोफत वाचनालय व डॉ. वि. वा. नेने ग्रंथालय या संस्थांचा स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

​ग्रंथपाल हाच चळवळीचा केंद्रबिंदू
​जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी यावेळी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

चर्चेदरम्यान राज्यस्तरीय पुरस्कार विजेते संजय शिंदे, ग्रंथपाल पूनम नाईक, अक्षता सावंत आणि सिद्धेश राऊळ यांनी “वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका” या विषयावर मते मांडली. ग्रंथपालांनी आता केवळ पुस्तकांचे कपाट न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांशी संवाद साधायला हवा, असा सूर या चर्चासत्रात उमटला.

​ग्रंथोत्सवात ‘आनंद यात्रा’ अंतर्गत प्रसाद कुलकर्णी यांनी वाचन संस्कृतीवर प्रभावी भाष्य केले. राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते अनंत वैद्य व श्रीराम वाचन मंदिरचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन पांचाळ यांनी केले, तर आभार प्रतिभा पाटणकर यांनी मानले.

​या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सतीश गावडे, गुरुनाथ मडवळ, ॲड. संतोष सावंत, जयेंद्र तळेकर, रुचिता केळकर, धाकु तानावडे, डॉ. विवेक पाटणकर, कैलास पवार, प्रसाद जाधव, किशोर कांबळे, सागर भोसले, हेमंत शिरसाठ, वैभव कोरगावकर, प्रियल रणसिंग, नितीन कुडाळकर, बापू सावंत, स्वप्नाली आजगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.