बांदा चेकपोस्टवर पोलिसांची मोठी दारू कारवाई

४ लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह इनोव्हा कार जप्त

राजापूर येथील संशयित ताब्यात 

बांदा l प्रतिनिधी :बांदा पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मोठी कारवाई केली. गोवा बनावटीच्या विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारी इनोव्हा कार पकडण्यात आली असून यामध्ये सुमारे ४ लाख ८ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशांत रवींद्र जाधव (३३, रा. राजापूर बौद्धवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बांदा चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या (MH 43 N 2339) या क्रमांकाच्या इनोव्हा कारला थांबवून पोलिसांनी झडती घेतली. गाडीमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सच्या गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले.

 

*जप्त केलेला मुद्देमाल*

पोलिसांनी या कारवाईत

मॅकडॉवेल्स ७२० लहान बाटल्या आणि ३६ मोठ्या बाटल्या (किंमत अंदाजे २,१७,४४०),रॉयल चॅलेंज २४० बाटल्या (किंमत ६०,०००), रॉयल स्टॅग ३३६ बाटल्या (किंमत ८४,०००), रॉयल ग्रीन आणि रिझर्व्ह ७ व्हिस्कीच्या बाटल्या (किंमत ४६,५६०) आणि ७ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत रवींद्र जाधव (वय ३३, रा. बौद्धवाडी-राजापूर, जि. रत्नागिरी) या संशयीताला ताब्यात घेतले आहे.

 

सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दासू पवार, पोलीस कर्मचारी प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील, नेल्सन फर्नांडिस आणि प्रशांत बोठे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस नाईक श्री. नाईक हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.