संशयित बाप-लेक पोलिसांच्या ताब्यात
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे जमिनीच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्धेची कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. सरस्वती धोंडी सावंत असे मृत महिलेचे नाव असून, या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी संशयित बाप-लेकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवळीये गावातील मधलीवाडी परिसरात जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून दोन कुटुंबांत धुसफूस सुरू होती. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून पुन्हा वाद उफाळून आला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित विजय सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ यांनी सरस्वती सावंत यांच्यावर कोयत्याने भीषण हल्ला चढवला. संशयितांनी त्यांच्या डोक्यात वर्मी घाव घातल्याने सरस्वती सावंत रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा एकनाथ धोंडी सावंत याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. गंभीर जखमी झालेल्या सरस्वती यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
*संशयित आरोपींना बेड्या*
घटनेचे गांभीर्य ओळखून सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी एकाच वाडीतील संशयित आरोपी विजय कृष्णा सावंत (६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (३७) यांना ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या जुन्या वादातून आलेल्या टोकाच्या संतापाने हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
*ओवळीये गावात दहशतीचे वातावरण*
एरवी शांत असलेल्या ओवळीये गावात या घटनेमुळे भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला असून दोन्ही संशयितांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

मृत सरस्वती धोंडी सावंत

संशयित विजय सावंत
संशयित रघुनाथ सावंत












