वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.
पांघरून चेहऱ्यावर ओढले तर पाय मोकळे रहातात आणि पायावर घेतले तर चेहरा उघडा रहातो अशीच काहींशी विचित्र स्थिती कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांची झालेली आहे. राज्यसरकारकडून कोकणाला दिलासा देण्याचा प्रयत्न यातून निश्चितच झाला आहे. त्यातला कमी अधिकपणा निश्चितपणे सरकारशी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या संवादातून निघून जाईल.पण कोकणच अर्थकारण केवळ आंबा, काजू यावरच नव्हे तर जांभुळ, रतांबा, नारळ आणि सुपारीही त्यात आहे. तर या ऋतुचक्राचा परिणाम थेट समुद्रातील मासेमारीवरही होताना दिसतोय. त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करताना चारही बाजूने त्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. कोकणात क्वचित होणारी गारपीट यावर्षी झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारपीटीचा परिणाम मोठा झाला आहे. अन त्याची टांगती तलवार कायम आहे…
जगभरावर युद्धाचे सावट या युद्धाचे परिणाम जगभरात शेतकऱ्यांपासून जनसामान्यांपर्यंत सर्वांनाच सोसावे लागत आहेत. एकिकडे युद्धजन्य स्थिती तर दुसरीकडे निसर्गाचे बिघडलेले ऋतुचक्र याचा परिणाम कोकणातील आंबा, काजू, कोकम, जांभुळ, करवंद, नारळ, सुपारी या सर्व फळपिकांवर झाला आहे. एकतर यावर्षी भरपूर झालेला पाऊस, उशिरा पडलेली थंडी याचा परिणाम कोकणातील कोट्यावधी रूपयांची उलाढाल करणाऱ्या आंबा, काजू बागायतींवर झाला. यावर्षी आंब्याचे पिक दरवर्षीच्या तुलनेत फक्त १५ टक्के इतकेच झाले आहे. आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे फारमोठे नुकसान झाले आहे. राज्यसरकारने कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांने बागायतीत केलेला खर्चही निघालेला नाही. यामुळे कोकणातील आंबा, काजू बागायतदार चिंताक्रांत आहे. बागायतदार शेतकऱ्यांकडून बागायतीत घेतलेले कष्ट आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचा कुठल्याच प्रकारे ताळमेळ घालता येत नाही. पांघरून चेहऱ्यावर ओढले तर पाय मोकळे रहातात आणि पांघरून पायावर घेतले तर चेहरा उघडा रहातो अशीच काहींशी विचित्र स्थिती कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांची झालेली आहे. राज्यसरकारकडून कोकणाला दिलासा देण्याचा प्रयत्न यातून निश्चितच झाला आहे. त्यातला कमी अधिकपणा निश्चितपणे सरकारशी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या संवादातून निघून जाईल.
कोकणच अर्थकारण केवळ आंबा, काजू यावरच जस अवलंबून आहे त्यात जांभुळ, रतांबा, नारळ आणि सुपारीही त्यात आहे. तर या ऋतुचक्राचा परिणाम थेट समुद्रातील मासेमारीवरही होताना दिसतोय. त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करताना चारही बाजूने त्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. कोकणात क्वचित होणारी गारपीट यावर्षी झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारपीटीचा परिणाम झाला. काही भागात गारांचा पाऊस पडला. केवळ शिडकावा नाही तर बऱ्यापैकी पाऊस पडला. जो काही थोडाफार आंबा, काजू झाडावर होता. त्यावरही या गारपीटीने डाग पडलेले आहेत. त्यामुळे जे बागायतदार शेतकऱ्यांच्या हाती फळ येतील ती देखिल जर डाग असलेली फळ विक्रीला गेली तर त्या मिळणार विक्रीचा भाव देखिल फार अधिकचा असणार नाही. उलट ग्राहक दर पाडूनच मागणार आहे. कोकणातील शेती बागायतदार शेतकऱ्याला एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. एका धक्याने सावरण्यापूर्वीच निसर्गचक्रातील अनेक धक्यानी कोकणातील शेतकरी पूरता हैराण झाला आहे.
कोकणात या हंगामात तयारी होणारी कोकणची मैना म्हणून ज्याची ओळख आहे. गंमतीने त्याला काळी द्राक्षही म्हणतात. ही कोकणची काळी मैना रानामध्ये अनेक ठिकाणी बऱ्यापैकी फळ दिसत होती परंतु इतर फळांप्रमाणेच या करवंदांवर पाणी पडले की ही करवंद खराब होतात. कोकणातील या करवंदाचीही एक वेगळी टेस्ट असते. कोकणातील डोंगर, कपारीत रानामध्ये काटेरी झुडपांवर कधी त्या काटेरी झाळीला विरळ तर कधी गच्च आलेली असतात. करवंदांच्या काटेरी झाळीवरची कच्ची करवंद पाहिल्यावर जर कुणाच्या तोंडाला पाणी सुटल नाही तरच नवल अशी या करवंदांपासूनही यावर्षी कोकणवासिय वंचित रहाण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. जांभुळ पिकाच्या बाबतीतही काहीशी तशीच स्थिती आहे. कोकणच्या अर्थकारणाला हातभार लावणारी जांभुळ देखिल हवामानाच्या बदलाने किती प्रमाणात उत्पन्न देणार याचाही भरोसा उरलेला नाही. जांभुळ, करवंद ही पूर्वी कोकणवासिय केवळ या एप्रिल-मे महिन्याच्या हंगामातला ‘रानमेवा’ म्हणूनच त्याकडे पाहिलं जातं होतं. त्यापलिकडे पूर्वी कधी जांभुळ, करवंद हे व्यावसायिकतेवर विराजमान झाली नव्हती. परंतु गेल्या काही वर्षात लाखोंची उलाढाल कोकणातील जांभळांपासून होऊ लागली. कोकणातील या रानमेव्यांचे औषधी गुणधर्माची चर्चा अधिकाधिक लोकांपर्यंत होऊ लागली आणि मग जांभुळ, करवंदांचही एक अर्थकारण सुरू झालं. त्याला व्यावसायिक स्वरूप आलं. मागील वर्षी जांभुळाच पिक फारच कमी प्रमाणात झालेल. यावर्षी कोणती फळ चांगली होतील हे बागायतदार शेतकऱ्याला ठरवणं आणि सांगणही अवघड झालं आहे.
कोकणात यावर्षी हवामानातील सतत होणाऱ्या बदलाने बागायतदार शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहेच. गारपीट अति उष्णता आणि संभाव्य अवकाळी पावसाचे संकट कोकणातील शेतकऱ्यासमोर आहे. या सर्व येणाऱ्या नैसर्गिक संकटातही कोकणातील शेतकरी निश्चितपणे नव्या उमेदीने बागायतीत उभा दिसेल.












