आंबा घाटात संशयास्पद जखमी अवस्थेत सापडलेल्या पाटणच्या तरूणाचा मृत्यू

घातपाताची शक्यता ?
साखरपा पोलीस करताहेत घटनेचा कसून तपास
देवरूख (प्रतिनिधी) :

सातारा जिल्ह्यातील ३० वर्षीय तरुण रत्नागिरी येथे मित्राबरोबर फिरण्यासाठी आला होता. तो घरी परतत असताना आंबा घाटात जखमी अवस्थेत महामार्ग पोलीसांना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सुधीर अर्जुन यादव (रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, सुधीरच्या संशयास्पद मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली असून या तरूणाचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून साखरपा पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

मित्राबरोबर फिरण्यासाठी आलेला तरूण सोबत परतत असताना अचानक जखमी अवस्थेत सापडतो कसा व त्याचा नंतर मृत्यू होतो, हे सर्व अनाकलणीय असल्याची चर्चा असून याबाबत एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर यादव हा आपला मित्र आशिष शांताराम भावके (रा. कराड) याच्यासह चारचाकी गाडीने रत्नागिरी येथे फिरण्यासाठी आला होता. रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेटी देऊन हे दोन्ही मित्र पुन्हा साताऱ्याच्या दिशेने परतत होते. प्रवासादरम्यान आंबा घाट परिसरात सुधीर हा गाडीतून खाली उतरला होता. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने त्याचा मित्र आशिष भावके हा त्याचा शोध घेत होता. दरम्यान, आंबा घाटातील रस्ता सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या हायवे पोलीसांना सुधीर हा रस्त्याच्या साईडपट्टीवर गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. हायवे पोलिसांनी तातडीने हालचाली करत जखमी सुधीरला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. रात्री ८ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुधीरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि तो जखमी अवस्थेत कसा आढळला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे यादव कुटुंबावर शोककळा पसरली असून साताऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.